मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.16 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल.
‘या’ 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक
दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल. यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
महत्वाच्या तारखा –
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
जिल्हाधिकारी प्रसिद्धी – 16 जानेवारी
अर्ज स्वीकारणे – 16 ते 21 जानेवारी
छाननी – 22 जानेवारी
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी (दुपारी 3 )
अंतिम उमेदवारी यादी आणि चिन्हे वाटप – 27 जानेवारी (दुपारी साडे तीन नंतर)
जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदान – 5 फेब्रुवारी (साडे सात ते साडे पाच)
मतमोजणी – 7 फेब्रुवारी (सकाळी दहा पासून)
मतदारांना 2 मते द्यावे लागणार –
या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला 2 मते द्यावे लागतील. यातील एक मत जिल्हा परिषद व दुसरे पंचायत समितीसाठी असेल. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येईल. विविध राजकीय पक्ष व उमेदवारांच्या मागणीनुसार ही प्रक्रिया महापालिका निवडणुकीसारखीच राबवण्यात येत आहे. या निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत. त्या जागांवर जातवैधता पडताळणी आवश्यक आहे. जातप्रमाणपत्र व जातवैधता पडताळणी उमेदवारी अर्जासोबत सादर करणे महत्त्वाचे आहे. पण एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल, तर त्याने जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करावा लागेल. पण निवडून झाल्यानंतर त्याला 6 महिन्यांच्या आत आपले प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्याची निवड रद्द होईल, असे वाघमारे म्हणाले.
दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्हा परिषद –
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे. एकीकडे राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, महानगरांमध्ये निवडणुका संपताच, ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.



