नेवासा(जनता आवाज वृत्तसेवा) :- चांदा (ता. नेवासा) येथे कंदुरीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून गावठी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाचा खून केल्याची घटना ११ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरज लतिफ शेख याला स्थानिक गुन्हे शाखेने बाभळेश्वर (ता. राहाता) परिसरातून ताब्यात घेतले असून, अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
शाहिद राजमहंमद शेख (२२, रा. चांदा) हा मित्रांसह कंदुरीच्या कार्यक्रमासाठी गेला असता, त्याचा सुरज लतिफ शेख व अक्षय बाळु जाधव यांच्याशी आर्थिक व्यवहार आणि जुन्या वादातून वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन आरोपींनी शाहिदच्या छातीत गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या शाहिदचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेबाबत यासीन इब्राहिम शेख यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३ (१), ३ (५) सह आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे १३ जानेवारी रोजी सुरज शेख हा बाभळेश्वर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. संशयिताला पकडण्यासाठी पथकाने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अक्षय बाळु जाधव व सुरज कैलास उबाळे यांच्यासह मिळून खून केल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्यातील अन्य दोन आरोपी फरार असून, गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा जप्त करण्यासाठी शोध सुरू आहे. ताब्यातील आरोपीस पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.



