श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील एज्युकेशन शाळेच्या पाठीमागील परिसरात घडली आहे. या हल्ल्यात सुनिल सोमनाथ औटी (वय २७) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोंणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी मंगल सोमनाथ औटी (वय ४५, रा. स्वप्ननगरी, गोंधवणी वॉर्डन, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन लक्ष्मण बनसोडे (रा. नेहरूनगर, गोंधवणी) व त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये सुनिल औटी व सचिन बनसोडे यांच्यात मारहाणीचा प्रकार घडला होता. त्यानंतर सचिन बनसोडे याने सुनिल याला वारंवार जिवे मारण्याची धमकी दिली होती. दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पुन्हा एकदा धमकी देण्यात आली होती.
दरम्यान, १९ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास एज्युकेशन शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर सचिन बनसोडे व त्याच्या एका अनोळखी साथीदाराने दुचाकी अथवा चारचाकी वाहनावरून येत सुनिल औटीवर चाकूने तोंडावर, पोटावर व पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सुनिल गंभीर जखमी होऊन खाली कोसळला.
घटनेनंतर त्याचे मित्र गौरव सोनटक्के व निखिल आवारे यांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात नेऊन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला लोंणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.



