अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्ह्यात अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेत सात बांगलादेशी महिला नागरिकांना तात्काळ मायदेशी हद्दपार केले आहे. सुधारित परदेशी नागरिक कायदा २०२५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जिल्हा पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार १७ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. संदीप मुरकुटे व पथकाने अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीशी परिसरात तपास केला असता दोन बांगलादेशी महिला मिळून आल्या. पुढील तपासात एकूण सात बांगलादेशी महिला नागरिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत संबंधित महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनी वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय व अधिकृत मार्गाऐवजी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची खात्री पटली. यामुळे त्यांनी भारतीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
पूर्वी अशा प्रकरणांमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन हद्दपारीस अनेक वर्षे लागत होती. मात्र सुधारित परदेशी नागरिक कायदा २०२५ मधील तरतुदीनुसार, अशा घुसखोर नागरिकांना तात्काळ ताब्यात घेऊन स्थानबद्ध ठेवणे व वरिष्ठ स्तरावरून हद्दपारीचे आदेश मिळताच मायदेशी पाठविण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक व परदेशी नागरिक नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या प्रक्रियेसाठी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित अधिकाऱ्यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणा व सीमा सुरक्षा दल, कोलकाता यांच्याशी सातत्याने समन्वय साधला. त्यानुसार १३ जानेवारी २०२६ रोजी हद्दपारीचे आदेश प्राप्त झाले.
मध्य रेल्वेच्या सहकार्याने नेमण्यात आलेल्या विशेष पथकाने १३ जानेवारी रोजी सातही बांगलादेशी महिला नागरिकांना सुरक्षितपणे त्यांच्या मायदेशी हद्दपार केले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षितता आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असून, भविष्यातही अशा घुसखोरांविरोधात कठोर पावले उचलली जातील, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



