अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा) :- जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार मोहीम राबवत अवैध ऑनलाईन बिंगो जुगार, गॅस रिफिलींग तसेच देशी व गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत चार वेगवेगळे गुन्हे दाखल करून एकूण सात आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून तब्बल ३ लाख ३२ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. पोउपनि अनंत सालगुडे यांच्यासह अतुल लोटके, सुनील पवार, गणेश लबडे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल व उत्तरेश्वर मोराळे या अधिकारी व अंमलदारांचा या पथकात समावेश होता.
दि. २२ जानेवारी रोजी पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत ऑनलाईन बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकत २ लाख ६३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलींग करताना एका इसमास अटक करून ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत देशी व गावठी दारू विक्री करणाऱ्या दोन इसमांवर स्वतंत्र कारवाई करत १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून, अवैध धंदे करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.



