कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार मधील रानशेंडा परिसर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू टीम मार्फत सुरक्षित बाहेर काढण्यात आले.रानसेंडा येथील सुनील किसन खर्डे यांच्या शेतातील विहिरीत पहाटेच बिबट्या पडल्याचे आढळून आले.
यावेळी सुनील खर्डे यांनी तत्परता दाखवत त्वरित वनाधिकारी प्रतिक गजेवार तसेच रेस्क्यू टीमचे अनिल जाधव यांच्याशी संपर्क करत त्यांना या सर्व घटनेची माहिती दिली .
दरम्यान याप्रसंगी क्षणाचाही विलंब न करता अनिल जाधव त्यांचे सहकारी सुनील जाधव वनाधिकारी प्रतीक गजेवार पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
अनिल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या अनुभव पणाला लावत विहिरीत पिंजरा सोडला व बिबट्याला काही क्षणातच अलगद पिंजऱ्यात कैद करत त्याला सुरक्षित बाहेर काढले.
दरम्यान यावेळी बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच पुढील अनर्थ टळल्याची भावना व्यक्त करत उपस्थित शेतकऱ्यांनी सुटकेचा नी:श्वास सोडला.
मागील आठवड्यातच बेलापूर रोड लगत असलेल्या बाग मळ्यात बिबट मादी पिंजऱ्यात कैद झाल्याची घटना ताजी असतानाच येथे विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. त्यामुळे कोल्हार परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता असून यापुढेही नागरिकांनी सतर्क राहून परिसरात बिबट्याची हालचाल आढळून आल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन प्रतीक गजेवार यांनी केले.
याप्रसंगी शेतकरी सुनील किसन खर्डे, अनिकेत पांडुरंग खर्डे, पत्रकार गणेश सोमवंशी , शुभम खर्डे,सोहम नवले,ओम खर्डे,रोहित खर्डे,राहुल निबे, राहुल खर्डे, अण्णा खर्डे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.



