spot_img
spot_img

दुबईतून सायबर फसवणूक; श्रीरामपुरातील पाच तरुण दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- दुबईत बसून ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींची सायबर फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, या फसवणुकीतील रक्कम श्रीरामपुरातील तरुणांच्या बँक खात्यांद्वारे फिरवली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी श्रीरामपुरातील पाच तरुणांना ताब्यात घेतले असून, गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर पुढील तपासासाठी दिल्लीला रवाना करण्यात आले.

दिल्ली येथील नोविन रॉय यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करत आपली १४ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे नमूद केले होते. या तक्रारीचा तपास करत असताना दिल्ली पोलिसांना दुबईतून कार्यरत असलेला ‘बिलीयन’ नावाचा तरुण या फसवणुकीचा सूत्रधार असल्याचे आढळून आले. तो ऑनलाईन माध्यमांतून जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढत असे आणि नंतर त्यांची रक्कम हडप करत असे.

बिलीयनच्या बँक खात्यांची व ऑनलाईन व्यवहारांची तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणावर रक्कम श्रीरामपूर परिसरातील खात्यांमध्ये ट्रान्सफर झाल्याचे समोर आले. तसेच व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि कॉल हिस्ट्री तपासताना दुबईतील बिलीयन आणि श्रीरामपुरातील श्रीधर नावाच्या तरुणामध्ये सातत्याने संपर्क असल्याचे निदर्शनास आले. यानंतर दिल्ली पोलिसांचे पथक बुधवारी रात्री श्रीरामपुरात दाखल झाले.

पोलिसांनी प्रथम श्रीधर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने प्रणव, विशाल, अजीज आणि अचरन या चार जणांची नावे सांगितली. त्यानुसार या पाचही तरुणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, दुबईतून सायबर फसवणूक करणारा बिलीयन हा मूळचा श्रीरामपुराचाच रहिवासी असून, श्रीधर हा त्याचा जवळचा मित्र आहे. बिलीयन आणि श्रीधर मिळून गरजू तरुणांना हेरत, त्यांना थोडी रक्कम देऊन आधारकार्ड, पॅनकार्ड मिळवून त्यांच्या नावाने बँक खाती उघडत असत. या खात्यांमध्ये ऑनलाईन फसवणुकीतील पैसे ट्रान्सफर करण्यात येत. विशेष म्हणजे, संबंधित खात्यांचे ई-मेल आयडी व इतर तांत्रिक बाबी दोघेच हाताळत असल्याने अनेक तरुणांना आपल्या खात्यांमधील व्यवहारांची माहितीच नसल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणात संबंधित तरुणांचा गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग किती आहे, तसेच त्यांना पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे का, याचा सखोल तपास दिल्ली पोलीस करत आहेत. या संपूर्ण घटनेला उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दुजोरा दिला आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!