spot_img
spot_img

दलित वस्त्यांच्या कामांवर आमदारांचा दबाव? एकाच ठेकेदाराला निविदा देण्याचा आग्रह – सरपंच मिनाताई साळवी यांचा गंभीर आरोप

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा): तालुक्यातील अनुसूचित जाती, जमाती व दलित वस्त्यांमधील विकासकामांच्या निविदा प्रक्रिया डावलून एकाच व्यक्तीच्या निविदा मंजूर करण्यासाठी तालुक्याचे आमदार दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाताई साळवी यांनी केला आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील सरपंचांसह पंचायत राज व्यवस्थेतील तिन्ही स्तरांवरील अधिकारी तीव्र तणावाखाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात साळवी यांनी नमूद केले आहे की, पंचायत राज त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत हा सर्वात महत्त्वाचा व प्राथमिक घटक आहे. अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी व दलित वस्त्यांतील विकासकामांचा आराखडा मंजूर करण्याचा संपूर्ण अधिकार ग्रामसभेला आहे. ग्रामसभेत मंजूर झालेली कामे पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे पाठवली जातात. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीकडून मान्यता मिळून निधीची तरतूद केली जाते, अशी स्पष्ट शासकीय प्रक्रिया आहे.

ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून शासन निर्णय व आदेशानुसार काम करते. दलित वस्त्यांतील कामे देताना ठरावीक निकष निश्चित करण्यात आले असून त्याबाबतचा अधिकार ग्रामपंचायतींनाच आहे. मात्र, तालुक्यातील आमदार संपूर्ण तालुक्यातील दलित वस्त्यांची कामे एकाच ठेकेदाराला देण्याचा आग्रह धरत असल्याचा आरोप साळवी यांनी केला आहे. तसे न केल्यास कामे बंद करण्याची तसेच चौकशी लावण्याची धमकी दिली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायतीमध्ये सरपंच अध्यक्ष तर ग्रामपंचायत अधिकारी सचिव असतात. मासिक सभेमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार सदस्यांचा असून ग्रामसभा सर्वोच्च आहे. अशा स्थितीत ग्रामपंचायतीच्या स्वायत्ततेवर दबाव आणून हस्तक्षेप करण्याचा, तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांना नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे साळवी यांनी ठामपणे सांगितले.

या प्रकारामुळे तालुक्यातील विकासकामांना खिळ बसत असून राजकीय हेतूने जाणीवपूर्वक विकासकामांमध्ये अडथळे निर्माण केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे मिनाताई साळवी यांनी सांगितले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!