spot_img
spot_img

जातीवाचक शिवीगाळ व धमकी दिल्या प्रकरणी श्रीरामपुरातील व्यापाऱ्यासह शाळा व्यवस्थापनावर ॲट्रॉसिटी दाखल

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- येथील श्री चैतन्य स्कूल, एकलहरे येथे कार्यरत असलेल्या व्यवस्थापनातील व्यक्तींविरोधात मयत कर्मचाऱ्याच्या नावावर पगार काढून आर्थिक अपहार केल्याचा तसेच जातिवाचक शिवीगाळ व धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा प्रल्हाद फुलपगार (वय ४३, धंदा शेती, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११५ (२), ३५१ (२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायदा कलम ३(१)(w)(i), ३(१)(r)(s), ३(२)(v-a) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, आरोपी राकेश न्याती, हेमंत (पूर्ण नाव अज्ञात), सुब्रमण्यम (पूर्ण नाव अज्ञात) व राजश्री आदित्या काळे (रा. श्रीरामपूर) यांनी संगनमत करून फिर्यादीचे पती दिवंगत प्रल्हाद राधाकिसन फुलपगार यांचे निधन झाल्यानंतरही त्यांच्या नावावर हजेरी रजिस्टरमध्ये खोट्या सह्या केल्या. तसेच त्यांच्या बँक खात्यावर पगार जमा करून तो रक्कम काढून आर्थिक अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.२१ वाजता फिर्यादी, त्यांची आई व मुलगा श्री चैतन्य स्कूल येथे गेले असता आरोपींनी जातिवाचक शब्द वापरून शिवीगाळ केली व धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. “कुठेही तक्रार द्यायची असेल तर द्या, आम्हाला कोणी काही करू शकत नाही. पोलीस आमच्या खिशात आहेत,” असे म्हणत दहशत निर्माण केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद २ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३३ वाजता करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात कोणताही विलंब नसल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे. घटनास्थळी भेट देणाऱ्यांमध्ये श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचा समावेश आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर करीत असून संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!