श्रीरामपुर (जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील इराणी गल्ली परिसरात गुंगीकारक औषधांची बेकायदा विक्री सुरू असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणीकडून नायट्राझेपम या झोपेच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ४ फेब्रुवारी रोजी अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपुर येथील पोलीस उपनिरीक्षक बेबी आण्णा शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत इराणी गल्ली, वार्ड क्रमांक १ येथे झैनब जाफर इराणी ही कोणतेही वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन अथवा परवाना नसताना गुंगीकारक औषधांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने पोलिसांचे पथक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनच्या मदतीने घटनास्थळी दाखल झाले.
पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या झडतीदरम्यान संबंधित तरुणीच्या घराच्या दरवाज्याच्या आतील बाजूस ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत नायट्राझेपम (Nitrazepam Tablets IP) या गुंगीकारक औषधांच्या एकूण नऊ पट्ट्या आढळून आल्या. या पट्ट्यांमध्ये प्रत्येकी दहा गोळ्या असून जप्त औषधांची एकूण किंमत ५८१ रुपये इतकी आहे.
सदर औषधांबाबत विक्रीचा परवाना किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांची शिफारस विचारली असता संबंधित तरुणी समाधानकारक माहिती देऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांनी औषधे पंचांसमक्ष जप्त केली. ही संपूर्ण कारवाई ई-साक्ष प्रणालीद्वारे चित्रिकरण करून नोंदविण्यात आली आहे.
या प्रकरणी झैनब जाफर इराणी हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १२३, १२५ व २७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गुंगीकारक औषधांच्या बेकायदा विक्रीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.



