नवी दिल्ली(जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर–परळी रेल्वे मार्गाबाबत शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली. खासदार वाकचौरे यांनी लोकसभेत आतारांकित प्रश्न क्रमांक ८७१ च्या माध्यमातून श्रीरामपूर–परळी रेल्वे लाईनच्या प्रगतीबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरानुसार सध्या बेलापूर (श्रीरामपूर) आणि परळी ही दोन्ही स्थानके अकोला, जालना व परभणी मार्गांशी जोडलेली आहेत. तसेच बीड मार्गे बेलापूर (श्रीरामपूर) आणि परळी वैजनाथ यांच्यात अतिरिक्त रेल्वे संपर्क प्रस्थापित करण्याचे कामही सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
यासोबतच महाराष्ट्र राज्यातील रेल्वे पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी अनेक नवीन रेल्वे मार्ग, तिसऱ्या-चौथ्या लाईनचे प्रकल्प व दुहेरीकरणाची कामे सुरू असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. यामध्ये अहिल्यानगर–बीड–परळी नवीन रेल्वे लाईन (२६१ किमी), बारामती–लोणंद (६४ किमी), इंदूर–मनमाड (३६० किमी), जालना–जळगाव (१७४ किमी), कल्याण–कसारा तिसरी लाईन (६८ किमी), वर्धा–बल्लारशहा तिसरी लाईन (१३२ किमी), राजनांदगाव–नागपूर तिसरी लाईन (२२८ किमी), जळगाव–मनमाड चौथी लाईन (१६० किमी) आणि सोलापूर–तुळजापूर–उस्मानाबाद नवीन लाईन (९५ किमी) यांचा समावेश आहे.
तसेच वर्धा–नांदेड (२८४ किमी), बडसा–गडचिरोली (५२ किमी), दौंड–मनमाड दुहेरीकरण (२३६ किमी), वर्षा–नागपूर तिसरी लाईन (७६ किमी), इटारसी–नागपूर तिसरी लाईन (२८० किमी), वर्धा–नागपूर चौथी लाईन (७९ किमी) आणि भुसावळ–खंडवा तिसरी व चौथी लाईन (१३१ किमी) या प्रकल्पांचाही यात समावेश आहे.
महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एकूण ५८,९४२ कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित असले तरी भू-संपादन, वनविभागाच्या परवानग्या, विविध विभागांची मान्यता, कायदा व सुव्यवस्था, भौगोलिक अडचणी आणि मनुष्यबळाची कमतरता यांमुळे अनेक प्रकल्प रखडल्याचेही केंद्र सरकारच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या सर्व प्रकल्पांचा सखोल पुनरावलोकन करून स्पष्ट वेळापत्रक ठरवणे, निधी वितरणात पारदर्शकता राखणे आणि नियमित प्रगती अहवाल जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे मत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.



