संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):-संगमनेर शहरात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पहाटे मोठी कारवाई करत तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तब्बल ५लाख ५३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक गठित करण्यात आले होते.
दि. ६ फेब्रुवारी रोजी पहाटे, संगमनेर शहर परिसरात गस्त व माहिती संकलन करत असताना एलसीबी पथकाला जमजम कॉलनी, गल्ली क्रमांक ९ येथे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत ठिकाणी छापा टाकला असता काही इसम कत्तल करताना आढळून आले.
पोलिसांना पाहताच काही आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले. मात्र पोलिसांनी साहेब मोहीद्दीन कुरेशी (वय २३, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने फरार आरोपींची नावे साहील उर्फ साद मुस्ताक कुरेशी व अयान महेबुब कुरेशी अशी सांगितली असून दोघांचा शोध सुरू आहे.
कारवाई दरम्यान घटनास्थळावरून१५०० किलो गोमांस (किंमत ४.५० लाख रुपये)दोन जिवंत गोवंशीय जनावरे (किंमत १ लाख रुपये)इलेक्ट्रिक वजनकाटा व लोखंडी सुरेअसा एकूण ५.५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) व प्राण्यांना निर्दयतेने वागविणे प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.



