spot_img
spot_img

श्रीरामपूरमध्ये सायलेज व टीएमआर उद्योगाला नवे बळ किसान कनेक्टच्या पुढाकारातून ॲग्रीनोरिक्स कंपनीचा शुभारंभ

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- “शेतकरी व पशुपालक हे चालते-बोलते विद्यापीठ आहेत. त्यांच्या अनुभवाच्या आधारावर जर संशोधन, नियोजन व गुणवत्तापूर्ण उत्पादन झाले, तरच कोणताही कृषी व पशुपालन व्यवसाय दीर्घकाळ यशस्वी ठरतो. टीएमआरसारख्या संकल्पनांमध्ये गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करता येणार नाही.” असे प्रतिपादन किसान कनेक्ट कंपनीचे सर्वेसर्वा सारंगधर निर्मळ यांनी केले.

श्रीरामपूर येथील एमआयडीसी परिसरात सायलेज व टीएमआर (टोटल मिक्स रेशन) निर्मिती करणाऱ्या ॲग्रीनोरिक्स अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी किसान कनेक्ट कंपनीचे सर्वेसर्वा सारंगधर निर्मळ ,पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ .मच्छिंद्र कोते,व्यंकटराव शेट्टी, डॉ.मदला मुरली कृष्णा , श्री लक्ष्मी कृष्णा,डॉ. प्रवीण कुमार,स्वरुपा राणी,जलागाम बालामुरली, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अशोक धिनदळे,मिल्को प्लस कंपनीचे विजय दांडगे, ‘शक्तिमान ऍग्रो कंपनीचे अरुल जोथी,स्वप्नील मयीनकर, देवराई ऍग्रो इन्फ्रा कंपनीचे संचालक मोनिश देवरे,किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ,दुग्ध व्यवसाय अभ्यासक अशोक खरात,आनंदी फिड्सचे संचालक कृष्णा संवत्सरकर ,रामनाथ वदक,अभियंते, एमबीए पदवीधारक तज्ज्ञ, विविध क्षेत्रातील उद्योजक व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना निर्मळ म्हणाले,ॲग्रीनोरिक्स कंपनीच्या संचालकांनी मोठी गुंतवणूक करत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प श्रीरामपूरमध्ये सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

त्यांनी मुरघास (सायलेज) क्रांतीचा उल्लेख करत सांगितले की, दुष्काळी परिस्थितीतही पशुपालकांनी मुरघासाच्या जोरावर पशुधन सांभाळले. आज अनेक शेतकरी दिवसाला २०० ते ५०० लिटरपर्यंत दूध उत्पादन घेत आहेत, हे या संकल्पनेचे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.

ॲग्रीनोरिक्स कंपनीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना दर्जेदार पशुखाद्य, आधुनिक तंत्रज्ञान व रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, श्रीरामपूर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी सारंग निर्मळ यांनी सांगितले की, “किसान कनेक्ट परिवाराच्यावतीने आम्ही शेतकरी व पशुपालकांच्या पाठीशी कायम उभे आहोत. शेतकऱ्यांची प्रगती हाच कोणत्याही उद्योगाच्या यशाचा खरा पाया आहे.”

यावेळी डॉ. मच्छिंद्र कोते यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पशुपालनामध्ये आज शेतकऱ्यांना कमी श्रमात अधिक उत्पादन मिळण्याची गरज आहे. संतुलित टीएमआर व दर्जेदार सायलेजमुळे दूध उत्पादनात वाढ तर होतेच, शिवाय जनावरांचे आरोग्य सुधारते. योग्य पोषण व्यवस्थापन हेच पशुपालनाच्या यशाचे खरे गमक आहे.”

डॉ. कोते यांनी पुढे सांगितले की, जनावरांच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार आहार व्यवस्थापन केल्यास आर्थिक नुकसान टाळता येते. “टीएमआर म्हणजे केवळ खाद्य नव्हे, तर तो शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा मजबूत पाया आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

ॲग्रीनोरिक्स अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे संचालक व्यंकटराव शेट्टी यांनी प्रास्ताविकात कंपनीचा उद्देश विशद केला. यावेळी खरात,संवत्सरकर , मोनिश देवरे,शेतकरी संघटनेचे शरद आसने, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक प्रसन्न धुमाळ यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने दुग्धउत्पादक शेतकरी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!