करजगाव(जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. १०) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे अंमळनेरसह मुळाकाठ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये गणेशवाडी येथील रोहित शिवाजी दरंदले (वय २०) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार असे की, मंगळवारी पहाटे सुमारे १२.३० वाजण्याच्या दरम्यान अंमळनेर येथे पाटाच्या कच्च्या रस्त्यालगत जुन्या वादाच्या कारणावरून वाद झाला. यावेळी आरोपी सिताराम अशोक जाधव (रा. शिरेगाव) याने आपल्या जवळील गावठी कट्ट्यातून गोळीबार करून रोहित दरंदले यास जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात सिताराम अशोक जाधव व प्रकाश बाळू भोसले (रा. निंभारी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनई पोलिसांनी प्रकाश भोसले यास ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी सिताराम जाधव हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी कैलास ज्ञानदेव दरंदले (वय ४५, रा. गणेशवाडी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएनएस कलम १०९(१), ३(५) तसेच आर्म अॅक्ट ३/२५, ७, २७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे व पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.



