कोपरगाव(जनता आवाज वृत्तसेवा):- दक्षिणगंगा गोदावरीच्या पावन तीरावर वसलेले, कोपरगाव जवळील बेट भागातील पुरातन, पौराणिक आणि धार्मिक वारसा लाभलेले संजीवनी पार आज नव्या तेजाने उजळून निघाले आहे. संजीवनी मंत्राने पावन झालेल्या या ऐतिहासिक स्थळाला जणू नवी ‘संजीवनी’च प्राप्त झाली आहे. भव्य सुशोभीकरण, आकर्षक रंगरंगोटी, सुदृढ वॉल कंपाऊंड, आकर्षक दिवे आणि निसर्गरम्य लँडस्केपिंगमुळे परिसराचे रूप अक्षरशः पालटले असून, आध्यात्मिकतेला सौंदर्याची देखणी चौकट लाभली आहे.
याबाबत माहिती देताना कोपरगाव बेट देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड म्हणाले, महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर गुरुवार दिनांक १२ रोजी साधू संतांच्या हस्ते या नव्याने साकारलेल्या परिसराचा लोकार्पण सोहळा होणार असून, भाविकांसाठी तो विशेष उत्सवाचा क्षण ठरणार आहे. संगमरवरी मार्बलची भव्यता, नैसर्गिक दगडांच्या स्लेट रचना, आकर्षक पेव्हिंग ब्लॉक्स, मजबूत रेलिंग, सुबक रंगकाम आणि दिमाखदार विद्युत रोषणाई यामुळे परिसर दैदिप्यमान झाला आहे. कलात्मक लोखंडी दरवाजे, दोन भव्य स्वागत कमानी, नंदी महाराजांसाठी सुसज्ज ‘नंदी घर’, दोन गजराजांच्या मूर्ती, भाविकांसाठी आरामदायी बेंचेस, गुरु शुक्राचार्यांची तेजस्वी प्रतिमा, कचदेव देवयानी यांचा सेल्फी पॉईंट, चार पुरातन समाध्या, तसेच वाहनस्वरूप सात फूट उंच सफेद घोड्याचा पुतळा – या सर्वांमुळे पार परिसराला अद्वितीय आकर्षण लाभले आहे.
खास जयपूरहून आणलेल्या कार्तिकस्वामींच्या मकराना मार्बल मूर्तीची स्थापना करण्यात आली असून, विष्णू मंदिरास नव्याने कळस बसवून संपूर्ण वॉटरप्रूफिंग व पॉलिशिंग करण्यात आले आहे. बगीच्यात लॉन, तब्बल पंधराशे विविध प्रकारची वृक्षारोपण करून हिरवाईची समृद्ध चादर पसरविण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यांत हे सर्व काम पूर्णत्वास गेल्याने परिसराने जणू नवी कात टाकल्याचे चित्र दिसते. या साठी मंदिर देवस्थानच्या वतीने खर्च केला असून कोपरगाव, व बाहेरच्या दानशूर व्यक्तींनी त्यात खारीचा वाटा उचलला आहे.
परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराची पौराणिक महती
नगर–मनमाड मार्गावर, शिर्डीपासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर वसलेले श्री क्षेत्र बेट-कोपरगाव हे परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांच्या तपश्चर्येने पावन झालेले अद्वितीय तीर्थक्षेत्र आहे. जगातील एकमेव असे हे मंदिर मानले जाते की, येथे विवाह किंवा कोणतेही शुभकार्य करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते—अशी दृढ श्रद्धा भाविकांत रूजलेली आहे.
“हिमकुन्द मृणालाभं दैत्यानां परमं गुरु ।
सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहम् ॥”
पूर्वी दंडकारण्याचा भाग असलेला हा परिसर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला टापूसदृश प्रदेश होता. भृगुवंशीय शुक्राचार्यांनी येथे कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांच्या कृपेने दुर्मिळ संजीवनी विद्या प्राप्त केली, अशी पुराणकथा सांगितली जाते. देव-दानव युद्धकाळात कचदेव, देवयानी आणि शुक्राचार्य यांची अमर कथा याच भूमीत घडली. कचदेवास संजीवनी मंत्राची प्राप्ती झालेला तो हा पवित्र स्थळ आज ‘संजीवनी पार’ म्हणून ओळखला जातो.
देवयानीचा विवाह राजा ययातीशी ग्रह-नक्षत्र प्रतिकूल असतानाही येथेच पार पडला. शुक्राचार्यांनी आपल्या तपोबलाने तो विवाह मंगलमय केला आणि वरदान दिले—“या भूमीत केलेले कोणतेही शुभकार्य, विशेषतः विवाह, मुहूर्ताशिवायही मंगलकारी ठरेल.” त्यामुळे आजही येथे विवाहसोहळे आणि विविध धार्मिक विधी श्रद्धाभावाने पार पडतात.
विष्णू मंदिराखालील गूढ भुयार….
भगवान श्री विष्णू मंदिराच्या खाली असलेले प्राचीन भुयार नव्याने उघडे करून ठेवण्यात आले आहे. हे भुयार गोदावरी नदीखालून गेलेले असल्याची स्थानिकांची समजूत आहे. या गूढ वास्तूमुळे परिसराच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कुतूहलात अधिकच भर पडली आहे.
हजारो वर्षांची पौराणिक परंपरा, गुरु-शिष्य परंपरेचे तेज आणि गोदावरीकाठची पावन भूमी यांमुळे श्री क्षेत्र बेट-कोपरगाव – परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर हे भाविकांसाठी अपूर्व श्रद्धास्थान ठरले आहे. नव्या सुशोभीकरणामुळे या तीर्थक्षेत्राच्या आध्यात्मिक तेजात सौंदर्याची नवी झळाळी लाभली असून, भाविकांसाठी हे स्थान अधिकच आकर्षणाचे आणि श्रद्धेचे केंद्र बनले आहे.



