spot_img
spot_img

शेवगाव पोलिसांची कारवाई; देशी पिस्तुलासह तरुण अटकेत २०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा): –अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या एका तरुणाला शेवगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन जिवंत काडतुसे, एक मॅग्झीन, दोन मोबाईल फोन आणि विना क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी असा एकूण २० लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १२) मध्यरात्री उशिरा आखेगाव रोड परिसरात करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आखेगाव रोडवरून एक काळ्या रंगाची, विना क्रमांकाची स्कॉर्पिओ शेवगावकडे येत असून त्यामधील व्यक्तीकडे देशी बनावटीचे पिस्तुल असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आखेगाव रोडवरील हॉटेल रिलॅक्स इन परिसरात सापळा रचून संबंधित वाहन थांबविले.

वाहनाची व संशयिताची झडती घेतली असता जावेद मुनिर सय्यद (वय २७, रा. भापकर वस्ती, आखेगाव रोड, शेवगाव) याच्या ताब्यात देशी बनावटीचे पिस्तुल, एक स्टील मॅग्झीन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. संबंधित शस्त्र बाळगण्याबाबत त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर वाहनाची झडती घेतली असता दोन मोबाईल फोन व विना क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली.

जप्त मुद्देमालात गावठी बनावटीचे पिस्तुल (२० हजार), मॅग्झीन (५००रुपये), दोन जिवंत काडतुसे (१००रुपये), सॅमसंग ए-२४ मोबाईल (८०हजार), सॅमसंग ए-२३ मोबाईल (२५हजार) आणि सुमारे १९ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पिओ गाडी यांचा समावेश आहे.

याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८५/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!