spot_img
spot_img

झगडे फाटा–वडगाव पान मार्गावर पुन्हा अपघात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू; रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांमध्ये संताप

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा) : – झगडे फाटा ते वडगाव पान या मार्गावरील दुरवस्थेमुळे पुन्हा एकदा भीषण अपघात घडला. जवळके येथे शुक्रवारी(दि.१३) सायंकाळी झालेल्या अपघातात पाच वर्षीय अंश विनोद जयस्वाल या बालकाचा ट्रकखाली मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास अवजड वाहनाने बालकाला धडक दिली. अपघातानंतर ग्रामस्थांनी तत्काळ त्याला राहाता येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या घटनेने जयस्वाल कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

यापूर्वी २३ जानेवारी रोजी अंजनापूर शिवारात कंटेनरच्या धडकेत गुरुत्व कैलास गाढे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. सलग दुसऱ्यांदा बालकाचा बळी गेल्याने नागरिकांनी रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी पथकासह पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

रस्त्याच्या स्थितीवरून प्रश्नचिन्ह झगडे फाटा–वडगाव पान हा मार्ग उत्तर-दक्षिण दळणवळणासाठी महत्त्वाचा मानला जातो. मात्र खड्ड्यांनी विदीर्ण झालेल्या रस्त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. शिर्डीकडे जाणारी अवजड वाहतूक या मार्गावरून होत असल्याने रस्त्याची झपाट्याने झीज होत असल्याचे स्थानिकांचे निरीक्षण आहे.

जवळके ग्रामपंचायत सरपंच सारिका विजय थोरात यांनी प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी केली आहे. निळवंडे कालवा कृती समितीचे कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे यांच्यासह ग्रामस्थांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.

निधी आणि जबाबदारीचा प्रश्न रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याची माहिती दिली जात असली तरी काम सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. संबंधित विभागांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सलग दोन अपघातांनंतर या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!