अहील्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम 2 साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यासंदर्भात आ. मोनिकाताई राजळे, आ.विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.
मंत्री विखे पाटील यांनी धरणातील पाण्याचा उपलब्ध साठा तसेच भविष्यातील पाण्याचे नियोजन विचारात घेवून आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले.
सदर आवर्तनाचा उजवा कालव्या वरील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून, सदर आवर्तन ४५ दिवसाचे असेल, त्याच्यासाठी धरणातील ५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव आहे. या या आवर्तनाचा लाभ अंदाजित २७हजार हेक्टर क्षेत्राला होईल.
मुळा डाव्या कालव्यासाठी ४५० एमसीएफटी इतका पाणीसाठा असून आवर्तन २१ दिवस चालणार आहे. त्याचा फायदा अंदाजीत २५०० हेक्टर इतके क्षेत्राला होईल.आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल असे नियोजन अधिकार्यांनी करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.



