अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- शहराचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
सदर तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत कळमकर यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शहरात तसेच शिरूर (जि. पुणे जिल्हा) येथील एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, आरोपी वेळोवेळी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तरुणीला कपडे काढण्यास भाग पाडत असे तसेच तिला तासनतास मानसिक त्रास देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अत्याचाराच्या वेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने काही व्हिडिओ स्वरूपातील पुरावे पोलिसांकडे सादर केल्याची माहिती समोर येत आहे. या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कळमकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष असून माजी महापौर म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यामुळे शहरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.



