spot_img
spot_img

श्रीरामपूरात गावठी कट्ट्यासह संशयित अटकेत; शहर पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितास अटक करून त्याच्याकडून पिस्तूल व लोखंडी कत्ती जप्त करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले. ही कारवाई गुरुवारी कॅनॉलजवळील नवी दिल्ली वॉर्ड क्र. २ परिसरात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की, इमरान उस्मान पठाण (वय ३१, रा. नवी दिल्ली वॉर्ड क्र. २, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) हा गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने परिसरात सापळा रचला.

कॅनॉलजवळील परिसरात संशयास्पद हालचाल करताना पठाण आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडून अंदाजे ३५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा (पिस्तूल) मॅगझीनसह जप्त करण्यात आला. पुढील तपासात त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता लाकडी मुठ असलेली सुमारे १२.५ इंच लांबीची लोखंडी कत्तीही आढळून आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३५ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ३, ४, ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम यांच्यासह अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, सचिन दुकळे, अमोल गायकवाड, रामेश्वर तारडे, सागर बनसोडे, रविंद्र शिंदे आणि अजित पटारे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम करीत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!