पुणे (जनता आवाज वृत्तसेवा):- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.पुणे महानगरपालिकेच्या एका कक्षामध्ये केलेल्या एका कृत्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. एका राजकीय नेत्यावर अशाप्रकारे गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.
विश्वनाथ तुकाराम लहाडे यांच्या तक्रारीवरून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. या मुळे आता वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल झाल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असंही बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ तुकाराम लहाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. वसंत मोरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत बोलताना मोरे यांनी फिर्यादी लहाडे यांच्याबद्दल हेतू पुरस्कार अत्यंत खालच्या दर्जाची आणि आक्षेपार्ह भाषा वापरली. केवळ पत्रकार परिषदेतच नव्हे, तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत सर्वांसमोर शिवीगाळ करत जातीवाचक उल्लेख करून मानसिक छळ केला. या प्रकारामुळे समाजात आपली प्रतिमा मलीन झाल्याचे लहाडे यांनी तक्रारीत म्हटलं आहे. शिवाजीनगर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वसंत मोरे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी आणि रोखठोक विधानांसाठी ओळखले जातात. मात्र, आता थेट ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलीस या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ फुटेज आणि पुराव्यांची पडताळणी करत आहेत. याप्रकरणी वसंत मोरे यांची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



