कोल्हापूर(जनता आवाज वृत्तसेवा):-साखर कारखान्यांमधील ऊस वजनकाट्यांबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारी येत असताना राज्य शासनाने या प्रकरणाची दखल घेत वैध मापनशास्त्र विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. वजनकाट्यांच्या तपासणी प्रक्रियेत सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत अभ्यास करून समितीने गुरुवार (दि. १२)पर्यंत अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर वजनकाट्यांतील कथित तफावतीबाबत प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे दरवर्षी तक्रारी दाखल होत असतात. वैध मापनशास्त्र विभागाकडून कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला जातो; मात्र त्यामध्ये क्वचितच दोष नोंदविला जात असल्याने शेतकरी संघटनांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनासह विविध शेतकरी संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासनाने तज्ज्ञ समिती गठित करण्याचा निर्णय घेतला.
समितीच्या अध्यक्षपदी एस. एच. चाटे (सह नियंत्रक, वैध मापनशास्त्र विभाग, संभाजीनगर विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य सचिव म्हणून डी. पी. पवार (उप नियंत्रक, सांगली) तर सदस्य म्हणून डी. के. शेजवळ (निरीक्षक, वाघोली विभाग) आणिआर. पी. टाळकुटे (निरीक्षक, बारामती विभाग) यांचा समावेश आहे.
समितीच्या अहवालानंतर साखर कारखान्यांतील वजनकाट्यांमध्ये आधुनिक प्रणाली लागू करण्याचा विचार आहे. सर्व वजनकाटे ऑनलाईन प्रणालीद्वारे सर्व्हरशी जोडण्याचा प्रस्ताव असून प्रत्येक वजनाची नोंद शासनाकडे उपलब्ध राहील. त्यामुळे वजन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, साखर कारखान्यांकडून वजनकाट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी या विषयावर शासनाकडे तक्रार केली होती. काट्यांवर आधुनिक प्रणाली बसविण्यासह शासनाने स्वतःचे वजनकाटे उभारावेत, अशी मागणी त्यांनी केली.



