श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील संगमनेर–नेवासा रोड परिसरात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस रिफिलिंग सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार आर. के. कुशन वर्क्स दुकानाच्या डाव्या बाजूला असलेल्या दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार मंगळवारी (दि. १०) दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तपासणी पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकला.
या कारवाईदरम्यान शोएब दादामिया शेख (वय २८, रा. गुलशन चौक, वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) हा व्यक्ती घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये गॅस भरत असल्याचे आढळून आले.
तपासणीवेळी घटनास्थळावरून बीपीसीएल व एचपीसीएल कंपनीचे रिकामे व अर्धवट भरलेले सिलेंडर,गॅस रिफिलिंग मशीन, इलेक्ट्रिक मोटार व पाईप,इलेक्ट्रॉनिक वजन काटे,
तसेच ३ व २ किलो क्षमतेचे लहान गॅस सिलेंडर व स्टोव्ह असा एकूण ८७,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या पथकाने दोन पंच व पोलिसांच्या उपस्थितीत केली. जप्त केलेला मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
या कारवाईत अन्नधान्य वितरण अधिकारी शिवराज पवार, निरीक्षण अधिकारी सुदर्शन केदार, राजेंद्र शिंदे, सुहास पुजारी तसेच पोलीस कर्मचारी तुपे व चौधरी यांचा सहभाग होता.
अवैधरित्या गॅस रिफिलिंग केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुरवठा विभागाने दिला आहे.



