शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा) :- गॅस टंचाईचा शिर्डी साईप्रसादावर परिणाम झाला आहे.भाविकांना आता एकच लाडू दररोज ४५ हजार लाडूंची विक्री; साठा फक्त १०–१२ दिवसांचा उरल्याने साई संस्थानचा निर्णय घेण्यात आला आहे.
इराण–इस्रायलमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. या परिस्थितीचा परिणाम आता धार्मिक स्थळांवरही जाणवू लागला असून शिर्डीतील शिर्डी साईबाबा मंदिर येथे प्रसाद वितरणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गॅस टंचाईमुळे भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडू प्रसादाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे.
दररोज लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत असल्याने प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात लाडू तयार केले जातात. साई संस्थानच्या माहितीनुसार, दररोज सुमारे ४५ हजार लाडू प्रसाद पाकिटांची विक्री केली जाते. तसेच दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना सुमारे ५० हजार बुंदी प्रसाद पाकिटांचे मोफत वितरण केले जाते.
मात्र लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची आवश्यकता असते. सध्या गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे प्रसाद तयार करताना इंधन बचत करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय साई संस्थानने घेतला आहे.
संस्थानकडे सध्या लाडू तयार करण्यासाठी लागणारा गॅस फक्त दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच उरला असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गॅसचा वापर नियंत्रित ठेवण्यासाठी आजपासून शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला फक्त एकच लाडू प्रसादाचे पाकीट देण्यात येणार आहे. गॅस वापरात काटकसर करून उपलब्ध साठा अधिक काळ टिकवण्याचा प्रयत्न संस्थानकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मनमाड इंडेन बॉटलिंग प्लांट येथून होणाऱ्या गॅस सिलिंडर पुरवठ्यावरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. यापूर्वी या प्रकल्पातून दररोज सुमारे १०० गाड्यांमधून सिलिंडरची वाहतूक केली जात होती. मात्र सध्या ही संख्या कमी होऊन ३० ते ३५ गाड्यांपर्यंत मर्यादित झाली आहे.
प्रकल्पातील दोन भरणी केंद्रांपैकी सध्या फक्त एकच केंद्र सुरू असल्याची माहिती आहे. गुजरातमधील हाजिरा येथून गॅस टँकर येत असले तरी संभाव्य टंचाई टाळण्यासाठी कोटा कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
तरीही ग्राहकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी दररोज काही प्रमाणात सिलिंडर भरून पाठवले जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.



