spot_img
spot_img

शिर्डीत तरुणीचा संशयास्पद मृत्यू

शिर्डी(जनता आवाज वृत्तसेवा):- तीर्थक्षेत्र शिर्डीत दर्शनासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आस्था सिंग (रा. सतना, मध्यप्रदेश) असे मृत तरुणीचे नाव असून निमगाव शिवारातील ‘हॉटेल साईबाबा इंटरनॅशनल सुप्रीम’मध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आस्था सिंग आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी बुधवारी हॉटेलमध्ये दोन खोल्या बुक केल्या होत्या. रात्री उशिरा आस्था राहत असलेल्या खोलीतून जोरात आरडाओरडा आणि भांडणाचे आवाज येत असल्याचे हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारी सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना आस्थाचा मृतदेह खोलीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यांनी तत्काळ शिर्डी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित व्यक्ती आस्थासोबत हॉटेलमध्ये आली होती का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची छाननी सुरू असून, रात्री त्या खोलीत नेमके कोण-कोण आले होते याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, हा प्रकार आत्महत्या की घातपात, याबाबत शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, रात्री झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता पोलिस नाकारत नाहीत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!