spot_img
spot_img

अहिल्यानगरमध्ये कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात ; ६५०० रुपयांची मागणी

अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता (अतिरिक्त पदभार उपअभियंता) सचिन सुरेश दिनकर (वय ४१) यांच्याविरुद्ध ६५०० रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई २३ मार्च रोजी सापळा रचून करण्यात आली.

तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून देहरे (ता. अहिल्यानगर) येथील स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम त्यांनी पूर्ण केले होते. या कामाचे बिल मंजूर करून पुढे पाठविण्यासाठी दिनकर यांनी एकूण बिलाच्या २ टक्के प्रमाणे १६,५०० रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. यापूर्वी १०,००० रुपये स्वीकारल्याची कबुली देत उर्वरित ६,५०० रुपयांची मागणी त्यांनी केली होती.

२३ मार्च रोजी पडताळणीनंतर सापळा कारवाईदरम्यान तक्रारदार लाच रक्कम देत असताना दिनकर यांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सापळा पथकाने पंचांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले. संशय आल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष लाच रक्कम स्वीकारली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. तपास अधिकारी म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे काम पाहत आहेत.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील संतोष शिंदे, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, हारून शेख आदींनी केली.

दरम्यान, नागरिकांनी भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास किंवा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागितली जात असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!