spot_img
spot_img

आश्वीतील मारहाण-लूट प्रकरणात ‘संघटित गुन्हेगारी’ कलम; आरोपींवर बीएनएस १११ लागू

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा) : –संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरात मारहाण व लूटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींवर आता संघटित गुन्हेगारीसंदर्भातील भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ लागू करण्यात आले असून, त्यामुळे आरोपींना तत्काळ जामीन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

११ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री दाढ रोड, आश्वी बु. येथील पेट्रोलपंपासमोर घडलेल्या घटनेत तक्रारदार व त्यांच्या मित्रावर आरोपींनी हल्ला करून मारहाण केली होती. तसेच त्यांच्या खिशातील सुमारे २५ ते ३० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि चाकूने ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४१/२०२४ दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात रविंद्र ऊर्फ बंटी मदने (टोळी प्रमुख), वसीम शेख आणि तुषार सोनवणे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान या आरोपींविरुद्ध यापूर्वीही खूनाचा प्रयत्न, अपहरण, मारहाण, दरोडा यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी स्थापन करून गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने, या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) लागू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षकांनी प्रस्तावास मंजुरी दिल्यानंतर हे वाढीव कलम लागू करण्यात आले.

या कलमानुसार आरोपींना जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच, या कलमामुळे आरोपींना किमान एक वर्ष जामीन मिळणे कठीण होते. अन्यथा, साधारण गुन्ह्यांत आरोपी काही दिवसांत जामिनावर बाहेर येण्याची शक्यता असते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आश्वी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

पोलीस प्रशासनाने नव्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रयत्न केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!