अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा) :- इराण–इस्त्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरताच जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर सोमवारी मोठा गोंधळ उडाला. “पाच दिवसांत पेट्रोल-डिझेल मिळणार नाही” अशी चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतली.
सकाळपासूनच शहरासह ग्रामीण भागातील पंपांवर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इंधन भरण्यासाठी वाहनधारकांमध्ये चढाओढ दिसून आली. काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रकारही घडल्याची माहिती आहे.
आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. विशेषतः व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या चर्चेमुळे पेट्रोल-डिझेलबाबत संभ्रम वाढल्याने अनेकांनी खबरदारी म्हणून इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र होते.
मात्र, पेट्रोल पंप चालकांनी या अफवांना फेटाळले आहे. “सध्या इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा सुरळीत सुरू आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी टँकर उशिरा पोहोचल्याने तात्पुरती अडचण निर्माण झाली असली, तरी ती तुटवड्याची स्थिती नसल्याचे सांगण्यात आले.
इंधन वितरणात काही नवीन नियमांमुळे किरकोळ विलंब होत असल्याची माहिती मिळत असली, तरी त्याचा दीर्घकालीन तुटवड्याशी संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. वास्तविक तुटवडा नसतानाही अफवांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर चुकीची अफवा पसरविणाऱ्या कारवाई होणार का
काल रात्रीपासून सोशल मीडिया चुकीच्या पद्धतीने अफवा पसरल्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केली होती. चुकीच्या अफवामुळे जनतेमध्ये संभ्रमानाची स्थिती उभी राहिली. अशा पद्धतीने चुकीच्या अफवांना सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यावर पोलीस प्रशासन कशी कारवाई करणार. हे पाहणे गरजेचे आहे.



