spot_img
spot_img

शिर्डीत जमीन व्यवहार फसवणूक; कॅप्टन खरात दाम्पत्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा, दोघांना अटक

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा): – शिर्डी परिसरात कोट्यवधी रुपयांच्या जमीन व्यवहारातून फसवणूक केल्याप्रकरणी कॅप्टन अशोककुमार खरात, त्यांच्या पत्नी कल्पना खरात यांच्यासह पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

शिर्डी पोलीस स्टेशन येथे सीआर नं. २१३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२३ पासून शिर्डी, नाशिक आणि राहाता परिसरात जमीन व्यवहार करत असताना कॅप्टन अशोककुमार खरात यांनी तीन कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगून दरमहा दोन टक्के व्याजाने रक्कम दिली. त्यानंतर आणखी २कोटी ५२ लाख रुपये देण्यात आले. या व्यवहारातून आरोपींनी व्याजाच्या नावाखाली १ कोटी ६४लाख रुपये किरण सोनवने, अरविंद बावके आणि अशोक तांबे यांच्या मार्फत घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीने व्याजाची रक्कम परत केल्यानंतर उर्वरित रकमेचा हिशोब करून जमीन पुन्हा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅप्टन अशोककुमार खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि अरविंद बावके यांनी टाळाटाळ करत व्यवहार पूर्ण केला नाही. यामध्ये चार एकर जमीन स्वतःच्या नावावर करून न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच फिर्यादीने विश्वासाने सही केलेले चेकबुक किरण सोनवने यांच्याकडे दिले असता त्याचा गैरवापर करून खात्यातील रक्कम परस्पर वर्ग करून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात (रा. नाशिक), कल्पना अशोककुमार खरात (रा. नाशिक), किरण नानासाहेब सोनवने (रा. निमगाव, ता. राहाता), अरविंद पांडुरंग बावके (रा. साकुरी, ता. राहाता) आणि अशोक परभत तांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आरोपी क्रमांक तीन व चार यांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध शिर्डी पोलीस घेत आहेत. जमीन व्यवहारातून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीमुळे शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!