कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- समता पतसंस्थेचे व्यवहार पूर्णपणे पारदर्शी व कायद्याच्या चौकटीत असून कोणत्याही प्रकारच्या अफवांना किंवा चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये, असे आवाहन संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी कोपरगाव येथे संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत केले. संस्थेची ग्राहक संख्या एक लाख दहा हजार इतकी असून वार्षिक उलाढाल सुमारे दोन हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून संस्थेने विश्वासार्हता आणि शिस्तबद्ध कारभार कायम राखला असून यापुढेही त्याच परंपरेने काम सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सरव्यवस्थापक सचिन भट्टड उपस्थित होते.
संदीप कोयटे म्हणाले की, संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेले असल्यामुळे कुणीही खाते उघडून व्यवहार करू शकतो. कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंधित सर्व खाती कायदेशीर पूर्तता करूनच उघडण्यात आली आहेत. त्या खात्यांद्वारे झालेले व्यवहारही नियमांनुसारच झाले आहेत. शिर्डी पोलिसांनी पत्राद्वारे मागवलेली सर्व माहिती अवघ्या दोन तासांत सादर करण्यात आली असून त्यांच्या सूचनेनुसार संबंधित खाती तात्काळ गोठवण्यात आली आहेत. यावरून संस्थेची प्रशासनाशी असलेली पारदर्शकता आणि सहकार्याची भूमिका स्पष्ट होते.
संस्थेच्या ठेवीदारांच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ९९ टक्के खातेदारांची साठ लाख रुपयांपर्यंतची रक्कम ‘लिक्विडिटी बेस्ट प्रोटेक्शन स्कीम’ अंतर्गत सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाबरण्याची गरज नसून समता पतसंस्था ही देशातील एक विश्वासार्ह आणि सक्षम संस्था म्हणून ओळखली जाते.
समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असल्याने राज्य फेडरेशनचे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. राज्य फेडरेशनच्या फक्त एका सामाजिक कार्यक्रमात अशोक खरात व काका कोयटे यांची भेट झाली आहे. परंतु प्रसार माध्यमे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या फोटोच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवू नये असे आवाहन देखील या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने करण्यात आले
खरात यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत पोलिसांकडून गोपनीयता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तपासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी संस्थेकडून त्या सूचनांचे काटेकोर पालन केले जात आहे. एक लाखाहून अधिक खातेदारांमध्ये एखाद्या खात्याची उलाढाल वेगळी ओळखणे सहज शक्य नसते, मात्र संबंधित सर्व व्यवहार व कागदपत्रे नियमबद्ध आहेत. मे २०२१ ते जानेवारी २०२६ या कालावधीत हे व्यवहार झाले असून सध्या संबंधित चार खात्यांमध्ये सुमारे तीस लाख रुपयांची रक्कम शिल्लक आहे. कोणतेही खाते बनावट नसून निधीचा उगम व व्यवहारांचा तपशील पोलीस तपासातूनच स्पष्ट होईल. बहुतेक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
एक लाख दहा हजार खातेदारांचा विश्वास अबाधित असून ‘लिक्विडिटी बेस्ट प्रोटेक्शन’मुळे समताच्या ठेवींना सुरक्षितता प्राप्त झाली आहे. समता पतसंस्थेबाबत काही माध्यमांमध्ये चुकीच्या व विपर्यस्त बातम्या प्रसिद्ध झाल्याने संस्थेची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. माध्यम प्रतिनिधींनी वस्तुनिष्ठ आणि जबाबदारीने वार्तांकन करावे, तसेच संस्थेच्या एक लाख दहा हजार खातेदारांच्या हिताचा विचार करावा, असे आवाहन करण्यात आले. समता पतसंस्थेचे सर्व व्यवहार कायद्याच्या चौकटीत, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीनेच सुरू असल्याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.



