spot_img
spot_img

‘ती’ चॅटींग पाहून त्याचा चढला पारा अन् थेट बायकोच्या अंगावर घातली फॉर्च्यूनर

नाशिक (जनता आवाज वृत्तसेवा):- गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे असाच एक प्रकार नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी भवन परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून एका सराईत गुंडाने आपल्या 22 वर्षीय पत्नीला भररस्त्यात बेदम मारहाण करत, तिच्या अंगावर थेट ‘फॉर्च्यूनर’ कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या  प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोजमीन मुस्तफा शेख (वय 22) ही गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पती समीर नासिर पठाण (रा. वडाळा गाव) याच्यासोबत आधार कार्डवरील नाव दुरुस्त करण्यासाठी महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथील कार्यालयात आली होती. काम सुरू असतानाच समीरने रोजमीनचा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमधील ‘इंस्टाग्राम’वरील चॅट पाहिल्याने समीरचा रागाचा पारा चढला.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत समीरने तिला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याने तिला बळजबरीने आपल्या फॉर्च्यूनर कारमध्ये (क्रमांक MH १६/७०७२) बसवले. चालत्या गाडीतही त्याने मारहाण सुरूच ठेवली. “तुला आज जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत समीर सीटच्या खालून काहीतरी हत्यार काढू लागला. यामुळे भयभीत झालेल्या रोजमीनने जीवाच्या आकांताने धावत्या गाडीतून उडी मारली आणि रस्त्यावरून पळू लागली.

पळून जाणाऱ्या पत्नीचा पाठलाग करत समीरने गर्दीची तमा न बाळगता “तुला आता गाडीखालीच मारतो,” असे ओरडत तिच्या अंगावर वेगाने कार घातली. सुदैवाने, गाडीचा जोरात धक्का लागून रोजमीन बाजूला फेकली गेल्याने तिचा जीव वाचला. मात्र, या धडकेत ती गंभीर जखमी झाली आहे. हा थरार पाहून आजूबाजूचे नागरिक धावून आल्याने संशयित समीर पठाण तिथून गाडीसह पसार झाला.या घटनेनंतर जखमी पत्नीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!