राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा) :-राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेत सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. या भेटीनंतर राहुरीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपाचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील राहुरीत दाखल झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी तनपुरे यांची घेतलेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, “राहुरी विधानसभा मतदारसंघाचा मी गेल्या १५ दिवसांत दौरा केला असून तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न समोर आले आहेत. या प्रश्नांसाठी निवडणूक लढविण्याचा विचार होता. के.के. रेंजमध्ये जाणाऱ्या जमिनी, पालिकेचा निधी, उद्योगवाढीसाठी एमआयडीसी, समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे मुळा धरणातून जायकवाडीला सोडावे लागणारे पाणी, तसेच मुळा धरणातील गाळ काढण्यासह विविध विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.”
“अनेक वर्षांपासून राहुरीला प्रभावी प्रतिनिधित्व मिळालेले नाही, यावरही चर्चा झाली. मात्र विधान परिषदेबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे तनपुरे यांनी स्पष्ट केले.
निवडणूक लढविण्याबाबत भूमिका स्पष्ट करताना तनपुरे म्हणाले, “राहुरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सुटण्याबाबत सकारात्मक संकेत मिळत असतील, तर सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेणार आहे.”
या घडामोडींमुळे राहुरी पोटनिवडणुकीत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तनपुरे यांच्या अंतिम निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



