अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधात न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट जारी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विवाहित तरुणीवरील अत्याचार प्रकरणात गेल्या सव्वा महिन्यापासून फरार असलेल्या कळमकरांचा पोलीस शोध घेत आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात २१ फेब्रुवारी रोजी कळमकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नोकरीचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक शोषण केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे त्रास दिल्याचाही उल्लेख तक्रारीत असून संबंधित पुरावे पोलिसांकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे.
पीडितेने शिरूर तसेच नगर तालुक्यातील विवाद घाट परिसरात वाहनात अत्याचार झाल्याचाही आरोप केला आहे. या प्रकरणाव्यतिरिक्त तोफखाना पोलीस ठाण्यात देखील कळमकर यांच्याविरोधात आणखी एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत असताना पारनेर तालुक्यात असल्याची माहिती मिळाली होती. मात्र कारवाईदरम्यान कळमकर यांनी पोलिसांना चकवा दिल्याचे समोर आले. याचवेळी पारनेर पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी देखील त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कळमकर यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधातील कायदेशीर कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्टँडिंग वॉरंट म्हणजे काय?
स्टँडिंग वॉरंट म्हणजे न्यायालयाने फरार आरोपीविरुद्ध जारी केलेला कायमस्वरूपी अटक आदेश होय. आरोपी सापडेपर्यंत किंवा न्यायालयाने तो रद्द करेपर्यंत हे वॉरंट वैध राहते. सहसा आरोपी सुनावण्यांना अनुपस्थित राहत असल्यास किंवा पोलिसांना सापडत नसल्यास, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या तरतुदीनुसार आरोपीला फरार घोषित करण्याच्या प्रक्रियेत असे वॉरंट जारी केले जाते.
दरम्यान, कळमकर यांच्या विरोधातील या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून त्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.



