spot_img
spot_img

‘पार्सल उशिरा दिल्याच्या रागातून तलवारीने हल्ला गरम तेल फेकून दोन जखमी, रोकड लुटून आरोपी फरार’

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- पार्सल देण्यास उशीर झाल्याच्या रागातून एका तरुणाने हॉटेलमध्ये घुसून तलवारीने जीवघेणा हल्ला करत गरम तेल फेकून दोन कामगारांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली. या घटनेनंतर आरोपीने काउंटरमधील रोकड लुटून जीवे मारण्याची धमकी देत पसार झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी आसिफ रफिक शेख (रा. सईदाबाद, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, नेवासा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘दिल्ली दरबार’ नावाचे हॉटेल ते मागील १२ वर्षांपासून चालवत आहेत.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, फकीरवाडा परिसरातील शाहरूख (पूर्ण नाव अज्ञात) हा इसम वारंवार हॉटेलमध्ये येऊन दमदाटी करत जेवणाचे पैसे न देता पार्सल घेऊन जात असे. ९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने शाहरूखच्या नावाने पार्सल मागितले. हॉटेलमध्ये गर्दी असल्याने पार्सल देण्यास उशीर झाला. संबंधित इसमाने पार्सल घेऊन कमी पैसे देत निघून गेला.

यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास शाहरूख मोटारसायकलवर हॉटेलमध्ये आला. मोटारसायकलला लावलेली तलवार काढून त्याने आसिफ शेख यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर वार केला. मात्र शेख यांनी काउंटरमध्ये आश्रय घेतल्याने वार चुकला.

दरम्यान, हॉटेलमधील कामगार मदतीला धावून येताच आरोपीने गॅसवरील गरम तेलाची कढई उचलून कामगारांवर फेकली. यात रामराज राजेंद्र (रा. श्रावस्ती, उत्तर प्रदेश, हल्ली श्रीरामपूर) व आरिफ रफिक शेख (रा. मीरा रोड, हल्ली श्रीरामपूर) हे दोघे गंभीर भाजले.

त्यानंतर आरोपीने काउंटरमधील सुमारे सात ते आठ हजार रुपयांची रोकड घेतली व “पार्सल दिले नाही तर गोळ्या घालून ठार मारेन, हॉटेलवर दंगा करेन” अशी धमकी देत मोटारसायकलवरून पसार झाला.

जखमींना तातडीने साखर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पीएमटी हॉस्पिटल लोणी येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून श्रीरामपूर शहर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!