9.9 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न

अहमदनगर, दि.15 ऑगस्‍ट (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्याच्या विकास करणे हाच आपला ध्यास आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी परिपूर्ण असा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यास मूर्त स्वरुप देऊन जिल्ह्याचा औद्योगिक, पर्यटन विकास , नवीन रोजगाराच्या संधी निर्माणाबरोबरच विशेष उपक्रम राबवुन सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत या विकासासाठी जिल्हावासियांनी सर्वोतोपरी योगदान देण्याचे आवाहन राज्याचे महसुल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आजचा स्वातंत्र्य दिन ऐतिहासिक अशा वातावरणात साजरा होत आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी आपल्या देशाची वाटचाल सुरु असुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची नवीन प्रतिमा तयार होत आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मंत्र बलशाली भारताच्या विकासाचे सुत्र बनले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांच्या योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान 09 ऑगस्ट, 2023 संपुर्ण देशभरात सुरु झाले आहे. या अभियानात जिल्हावासियांनी सहभाग नोंदवुन आपल्या मातृभूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

“शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे राज्यभर आयोजन करण्यात येऊन त्याद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ राज्यातील जनतेपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविण्यात येत असुन राज्य शासनाच्या माध्यमातून विकासरुपी पंचामृत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने देशात पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयामध्ये पीकविमा राबविण्याचा निर्णय घेतला. गतवर्षामध्ये केवळ 2 लक्ष शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये भाग घेतला होता. परंतू यावर्षी जिल्ह्यातील 11 लक्ष शेतकऱ्यांनी या पीकविमा योजनेमध्ये सहभाग नोंदवुन आपले पीक संरक्षित केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन हरघर नल योजना राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातुन या योजनेसाठी जिल्ह्यात 4 हजार कोटी रुपयांच्या निधीद्वारे पाणी पुरवठ्याची कामे केली जात असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्ह्यात रोजगार निर्मितीवर अधिक प्रमाणात भर देण्यात येत असुन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती शिबीराच्या माध्यमातुन 5 हजार 989 युवकांना करिअर संधीचा तर तीन रोजगार मेळाव्याद्वारे 1 हजार 130 युवकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्याला फार मोठा अध्यात्मिक वारसा आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष देण्यात येत असुन जिल्ह्यातील सहा साहसी पर्यटन स्थळाला चालना देण्यात येत आहे. जिल्ह्यात अद्यावत अशा क्रीडा संकुलाच्या कामालाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या.

उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक अंबादास सुखदेव हुलगे, पोलीस निरीक्षक दिनेश विठ्ठल आहेर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अनुकंपा नियुक्ती धोरणांतर्गत उमेदवारांना नियुक्तीपत्र, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा व कृषी विभागातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुरीच्या नायब तहसिलदार संध्या दळवी यांनी केले.कार्यक्रमास पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!