श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव येथे सकाळी सहाच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर उलटून एक जण दबून ठार झाला. पोलिसांनी डंपर व वाळू घेतली ताब्यात घेत पंचनामा केला आहे.ही घटना आज गुरुवार (दि. 17) रोजी घडली.शफीक अहमद पठाण उक्कलगांव असे वाळूच्या डंपरखाली दबून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोदावरी नदी पात्रातून रात्रीच्या वेळी शेकडो ट्रॅक्टरद्वारे तसेच डंपरद्वारे वाळू उपसा केला जातो. या भागात वाळूचे अनेक पाँईट असुन काही दिवसांपुर्वी याच भागातील नायगाव डेपो शासनाने ताब्यात घेऊन वाळू धोरण राबवले होते. असे असतांना शासनाला हि चोरटी वाळू रोखता आली नाही. असाच वाळू उपसा करणारे विनाक्रमांकाचे डंपर गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नदीतून वाळू घेऊन येत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने खैरी निमगांव येथे उलटले. त्यात एकजण ठार झाला तर उर्वरीत तिन-चार जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना प्रत्यक्ष दर्शींच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी श्रीरामपूर येथे पाठवण्यात आले.




