राहाता दि.१७ (जनता आवाज वृत्तसेवा):-पश्चिम वाहीनी नद्याचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोर्यात वळविण्याचे पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या धोरणाला मूर्त स्वरुप देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने जिरायती भागाला मोठा दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील स्व.गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र पाणी परीषदेच्या वतीने याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता.तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे परीषदेचा या प्रस्तावाची सविस्तर माहीती जाणून घेतली होती.मागील अडीच वर्ष याबाबत कोणताच निर्णय झाला नाही मात्र राज्यात युतीचे सरकार येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पाणी परीषदेच्या प्रस्तावाचे धोरणात रुपांतर करण्याचा निर्णय करून एकप्रकारे लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरुप मिळत असल्याचे दिसून येते.
शासन आपल्या दारी या उपक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत थेट भाष्य करून जिरायती भागातील शेतकऱ्यांना आश्वासित केल्याच्या निर्णयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत करून आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात या विषयाच्या केलेल्या उल्लेखाचा धागा पकडून मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी निळवंडे कालव्याचे पाणी युती सरकारने जिरायती भागाला दिले.त्याच पध्दतीने गोदावरी खोर्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी तुटीच्या खोर्यात पाणी वळविण्याचा निर्णयाला गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले
मराठवाडा विरूध्द नगर नासिक हा पाण्याचा संघर्ष कायम स्वरुपी मिटविण्यासाठी प्रयत्न करण्याचे केलेले सुतोवाच महत्वपूर्ण मानले पाहीजे.या संदर्भात प्रशासकीय स्तरावर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत केलेल्या मागणीची तसेच संघर्षाची दखल राज्य सरकारने घेतली आहे.




