श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिर्डी मतदार संघात वाकचौरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. याबाबत उध्दव ठाकरे यांच्याशी वाकचौरे यांची प्राथमिक चर्चा झाली असून दि.२३ ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याच उपस्थितीत ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.त्याच दिवशी त्यांची शिर्डी येथून अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार असून याबाबतचे सूचक वक्तव्य खुद्द भाऊसाहेब वाकचौरे यांनीच श्रीरामपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले.वाकचौरे हे आज पत्रकार परिषदेच्या निमित्ताने श्रीरामपूर येथे आले होते.यावेळी राजेंद्र निंबाळकर, सचिन बडदे, निखील पवार, रामा अग्रवाल, लखन भगत, किशोर ढोकचौळ, यासीन सय्यद, रमेश घुले आदी त्यांच्या समवेत उपस्थित होते.
वाकचौरे यांचा मतदारसंघातील गावागावात कार्यकर्त्यांशी संपर्क असून ते पुन्हा शिर्डीतून निवडणुक लढवण्यासाठी सज्ज झाल्याने या मतदारसंघात रंगतदार लढत होईल अशी चिन्हे दिसून येत आहेत.’आपला माणूस आपल्यासाठी’ असे म्हणत वाकचौरे यांनी आपली यापूर्वीची खासदारकीची कारकीर्द यशस्वी केली होती.आता पुन्हा ते निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.



