नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- मागील वर्षी अहमदनगर जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून अजूनही पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक लाभ मिळाला नाही.
महाराष्ट्र शासनाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये पंचनामे करून त्वरित शेतकऱ्यांना आर्थिक लाभ द्यावा अशी मागणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व संततधार पावसामुळे खरीप पिक नष्ट झाले होते. काही प्रमाणात या पिकांचे तलाठी व कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे ही केले होते व तशी यादीही त्यांनी संबंधिताकडे पाठवली आहे. तरी शासनाकडून नजरचुकीने काही शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करावीत. तसेच नुकसान ग्रस्तांच्या यादीत काही शेतकऱ्यांची नावे दिसत नाहीत. त्यामध्ये स्थानिक पातळीवरती तलाठी व कृषी अधिकारी यांचा काहीही दोष नसून यादीमध्ये नगरचुकीने नावे जर राहिले असतील तर पुन्हा पंचनामे करून उर्वरित शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्याने न्याय मिळवून द्यावा अशी ही मागणी रावसाहेब घुमरे यांनी केली आहे. तातडीने यादी दुरुस्त करावी. वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी.
तसेच यावर्षी पावसाने अहमदनगर जिल्ह्यात दडी मारली असून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातच कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशीही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे यांनी शासनाकडे मागणी केली आहे.



