नगर( जनता आवाज वृत्तसेवा ): – शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन यामध्ये खूप मोठी तफावत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात काम करायला आवडते. राहाता तालुक्यात 40 हजार महिलांचे संघटन केले असून, महिला सक्षमीकरणीसाठी या माध्यमातून आम्ही मोठी मदत केली आहे. रोटरी क्लबनेही ग्रामीण भागात काम करावे, असे प्रतिपादन जि. प. माजी अध्यक्षा रो. शालिनीताई विखे पा. यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीचा पदग्रहण सोहळा जि. प. माजी अध्यक्षा रो. शालिनीताई विखे पा. यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी नूतन अध्यक्ष चंदना शाह-गांधी, सचिव शुभश्री पटनाईक, माजी अध्यक्ष रवी डिक्रुज, रो. सुरेश साबू, डीजी जागृती ओबेरॉय, डॉ. सईद शेख, निखील कुलकर्णी, रफिक मुन्शी, डॉ. राजीव चिटगोपेकर, दिनकर टेमकर, उमेश कोदे, अमित धोकरिया, किशोर बोरा, प्रसन्न खाजगीवाले, नीलेश वैकर, अमित बोरकर, उज्ज्वला राजे, मधुर बागायत, मरलीन मन्सा, श्रीमती रेले, श्रीमती खंडेलवाल, प्रसन्न देवचक्के, माधव देशमुख यांच्यासह रोटरीयन उपस्थित होते.
विखे पुढे म्हणाल्या की, आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावेनतून सर्वांनी काम केले पाहिजे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला बचतगटाच्या माध्यमातून प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण केले आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजीबाईचा बटवा आपण विसरत चाललो आहोत. वयस्कर महिलांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत. ग्रामीण विभागातील प्रश्न वेगळे असतात ते सोडविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
रो. सुरेश साबू म्हणाले की, रोटरी एक मोठी संस्था असून, भारतात चांगले काम करीत आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी अग्रेसर असते. पोलिओमुक्त भारत यामध्ये रोटरीचा मोठा वाटा आहे. सामाजिक कामाबरोबरच शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रातही रोटरी अग्रेसर असल्याचे ते म्हणाले.
नूतन अध्यक्षा चंदना शाह-गांधी म्हणाल्या की, रोटरी क्लब एक कुटुंब आहे. रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी बचतगटाच्या माध्यमातून त्यांना मागील वर्षी प्रशिक्षण देण्यात आले. ते यावर्षीही दिले जाईल. बँकेची ऑनलाईन माहिती व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षणाद्वारे माहिती दिली असून, याही वर्षी हा उपक्रम सुरू राहील. याबरोबरच भरीव उपक्रमांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी अध्यक्ष रवी डिक्रुज यांनी मागील वर्षीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी जागृती ओबेरॉय, शुभश्री पटनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन निखील कुलकर्णी यांनी केले, तर आभार शुभश्री पटनाईक यांनी मानले.



