श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर-एकलहरे हम रस्त्यावरील ठोंबरे वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला असून काल सकाळी पहाटेच्या सुमारास गोऱ्यावर हल्ला करून त्यास मोठ्या प्रमाणावर जखमी केले आहे. या आधी देखील ह्या परिसरातील शेळ्या, कोंबड्या सह कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडत असल्याने
बिबट्याने केलेला हल्ला अधिक भयानक होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचं वातावरणं पसरले आहे.याबाबद वन विभागाने देखील परीसरात बिबट्या वावरत असल्याबाबत दुजोरा दिला आहे.
टिळकनगर-एकलहरे रस्त्यालगद ठोंबरे वस्ती असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे. काल पहाटेच्या सुमारास येथील कैलास ठोंबरे यांच्या मालकीचा सुमारे एक वर्षाचा गोरा (बैल) यावर बिबटयाने हल्ला केला. बाहेर गोऱ्याचा ओरडण्याचा आवाज येताच कैलास ठोंबरे त्यांचा मुलगा अक्षय ठोंबरे, नयन ठोंबरे सह वस्तीचे लोक जागे झाले बाहेर पाहिले असता बिबट्याने गोऱ्यावर हल्ला केल्याचे दिसून आले. लगेचच नयन ठोंबरे सह वस्तीवरील लोकांनी जोरजोरात आरडाओरडा करीत बिबट्याला पिटाळून लावले मात्र तोपर्यंत बिबट्याने गोऱ्याला मोठ्या प्रमाणावर जखमी केले होते. याबाबद वन विभागाला तात्काळ माहिती देताच वनअधिकारी पी. डी सानप घटनास्थळी दाखल झाले व जखमी गोऱ्याची पाहणी करण्यात आली असून सदर पशुधन हानीचा शासन नियमानुसार नुकसान भरपाई मिळावी तथा हिंस्त्र प्राणी बिबटयाला तात्काळ जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य सागर ढोकचौळे, पत्रकार रिजवान जहागीरदार, आर. आर. पाटील, भैय्या पांडे, अक्षय ठोंबरे, अनिल साळुंके, कुणाल ठोंबरे, आदेश गिरमे, आकाश गिरमे, रय्यान शेख, रवी निर्मळ सह येथील नागरिकांनी केली आहे.