spot_img
spot_img

जायगुडे आखाडा येथील त्रिदिनात्मक सप्ताह सोहळयाची स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या किर्तनाने सांगता

नेवासा (  जनता आवाज वृत्तसेवा  ):– नेवासा तालुक्यातील जायगुडे आखाडा येथील हनुमान मंदिरात गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेने श्रावण मासाच्या निमित्ताने सुरू असलेल्या त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची भक्तिमय वातावरणात देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली.ज्यांनी आपल्या हे जग दाखवले अशा आईवडीलांना जीव लावा त्यांना अंतर देऊ नका शेवटच्या श्वासापर्यंत आईवडीलांची सेवा करा असे आवाहन स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.

पुढे बोलताना स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले की, जन्म देणारे आईवडील हे घरातील दैवते आहेत,त्यांची सेवा करून आशीर्वाद घेणे हे पुण्याचे कार्य सर्वांना करायचे आहे,घरातील वृद्धांची सेवा करा,जीवनात त्यांना कधीही विसरू नका,त्यांच्या केलेल्या सेवेने आपल्या जीवनात भगवंतांची भक्ती केल्याचे समाधान व आशीर्वादच मिळतील असा संदेश त्यांनी यावेळी बोलतांना दिला.जीवन हे अनमोल आहे त्यासाठी एकमेकांना प्रेम द्या,गुंठ्यासाठी भावासाठी भांडू नका,व्यसनांपासून दूर रहा ज्यांच्या घरासमोर गावरान गाय आहे त्यांच्या गंगा यमुनेचा संगम आहे गाईंचे रक्षण करून तिचे पालन करा,आपल्या चांगल्या आरोग्यासाठी जुन्या खेळांचा अंगीकार करा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.

२५ व्या त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सोहळयात स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली.

यावेळी दादासाहेब गंडाळ,सर्जेराव चव्हाण,भारत कोकणे, जायगुडे आखाडा पारायण कमिटीचे विलास कोकणे, बाबासाहेब चव्हाण,दत्तात्रय जायगुडे अमोल चव्हाण,ज्ञानेश्वर जायगुडे,रविंद्र कोकणे,अशोक बेंद्रे, राजेंद्र चव्हाण,अण्णाभाऊ गायकवाड, आबासाहेब कोतकर, शिवाजी चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित भाविकांना गोरक्षनाथ कोकणे, अरुण बेंद्रे, दत्तात्रय चव्हाण यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला .

सप्ताहाच्या प्रारंभी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांचे आगमन झाल्यानंतर साईनाथनगर ते जायगुडे आखाडा अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांनी केलेली विठ्ठल रुख्मिणीची वेशभूषा सर्वांचे आकर्षण ठरले होते.भाविकांनी सडा रांगोळया घालत स्वामींचे स्वागत केले.जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाचे सादरीकरण करून स्वागत केले.यावेळी निघालेल्या मिरवणुकीत सुवासिनीसह बालिका नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!