राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-दिनांक १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप गाडीमधून काही जनावरे कत्तलीसाठी चालवली होती. काही तरूणांनी या गाडीचा पाठलाग करुन ती गाडी राहुरी येथील जोगेश्वरी आखाडा येथे पकडून सदर जनावरे व गाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.
निलेश प्रदिप शिरसाट, वय २३ वर्षे, रा. देसवंडी, ता. राहुरी. या तरूणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १ वाजे सुमारास निलेश शिरसाठ, पप्पु बबन गायकवाड, कुलदीप सुभाष बोबडे, अजय उर्फ बन्नी गोरख बर्डे, प्रज्जल सुर्यभान झावरे, सनी सुधाकर शिंदे हे राहुरी येथील नगर मनमाड रोडलगत हिरा मोती पान स्टॉल येथे बसले होते.
त्यावेळी त्यांना बोलेरो पिकअप वाहन नं. एम एच १२ एल टी ९२९७ ही गाडी जनावरांनी भरलेली गाडी राहुरी कडुन राहुरी फॅक्टरीच्या दिशेने जाताना दिसली. सदर तरूणांनी मोटरसायकलवर त्या गाडीचा पाठलाग करुन जोगेश्वरी आखाडा येथे ती गाडी पकडली. त्यावेळी गाडीतील दोघेजण पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन ३ लाख रूपए किंमतीची पिकअप गाडी व ४४ हजार रुपयांची जनावरे असा एकूण ३ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अज्ञात दोन इसमावर गुन्हा रजि. नं. ९१३/२०२३ भादंवि कलम १८८, २६९ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम ५ अ (१), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.



