टाकळीभान (जनता आवाज वृत्तसेवा):- टाकळीभान येथील इंडिका वन एटीएम मध्ये खराब नोटा निघाल्या असून याचा ग्राहकांना नाहक भुर्दंड बसत आहे. यासंदर्भात कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
सविस्तर माहिती अशी की टाकळीभान नेवासा रोड ,विठ्ठल रुक्मिणी कॉम्प्लेक्स येथील गाळ्यामध्ये इंडिका वन हे एटीएम कार्यान्वित आहे. मार्केट कमिटी उपबाजार आवारच्या समोरच हे एटीएम असल्याने या ठिकाणी अनेक ट्रांजेक्शन होतात.रविवार दि. 27 या दिवशी कारवाडी येथील शेतकरी बाळासाहेब किसन पवार यांनी या एटीएम मधून दुपारी १२.३० दरम्यान ५०० रुपये पैसे काढले. त्यामध्ये दोन शंभराच्या नोटा फाटक्या निघाल्या असून त्या मार्केटमध्ये चालण्यायोग्य नाहीत.
सदर व्यक्ती ही शेतकरी कुटुंबातील असून काबाडकष्ट करून कमावलेले पैसे असे एटीएम मधून जर फाटक्या नोटा निघत असतील तर या ग्राहकांनी कुणाकडे न्याय मागायचा. इथून पुढे एटीएम मध्ये कॅश भरताना एटीएम चालक व व्यवस्थापक यांनी नोटा तपासून टाकाव्यात. हाक नाहक त्याचा त्रास ग्राहकांना होत असून. कोऱ्या नोटा देणाऱ्या एटीएम वरील विश्वासार्हतेला यामुळे तडा जात आहे.या संदर्भात त्यांनी इंडिका वन या कस्टमर केअर वर संपर्क साधला असता कुणीही फोन उचलला नाही व त्यांच्या समस्येचे निराकरण झाले नाही.याबाबत त्यांनी पत्रकार बांधवांकडे धाव घेतली व आपली व्यथा मांडून घडलेला प्रकार सांगितला.



