परमेश्वराची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून जर ही धावपळ आणि पायपिट चालू असेल तर निदान काय कृपा परमेश्वराने आपल्यावर करावी त्याचाही विचार केलाच पाहिजे… पण तसा विचार करताना कोणी दिसतच नाही… म्हणूनच तीर्थांच्या किंवा मंदिराच्या भोवती असलेली भक्तांची गर्दी हा फक्त मंदिरावर आणि देवाच्या समोर घोषणा देत निघालेला एक मोर्चा असावा, असं माझं व्यक्तिगत मत आहे… या मोर्चाचेही तेच म्हणणे असते, जसे कर्मचारी मोर्चात घोषणा देत असतात…
*हमारी मांगे पुरी करो…*
*हमारी मांगे पुरी करो…*
बरं त्या एकजुटीने निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या फारच थोड्या किंवा जवळजवळ सर्वांच्या सारख्याच असतात… पण येथे तर हजारो भक्त आणि लाखो मागण्या… एकेकाची देवापुढे मागण्यांची भली मोठी यादी… जसा मॉलमध्ये घुसलाय… काय घेऊ आणि काय नको… परंतु ईश्वरी शक्तीला या प्रवृत्ती कधीच आवडत नसतात… जे सतत हात जोडून डोळे झाकून तेचतेच रडगाणं चालू ठेवत असतात… अरे आपल्या कर्तुत्वावर आणि आपल्या लायकीवर त्या गोष्टी परमेश्वर ठरवत असतो… तू त्याच्याकडे मागतोच कशाला…? आणि त्यानं तरी का द्यावं…? आणि त्यानं तुझंच का ऐकावं…? साल्या तुझी बायको तुझं ऐकत नाही… तुझं कार्ट तुझं ऐकत नाही… त्यानं कशाबद्दल ऐकावं…? आणि तुझ्या मागण्या तू मान्य करून घ्यायला निघालाय, पण त्याचीही काहीतरी मागणी असेलच ना…? ती कधी पूर्ण केली का तू …?
सत्य, करुणा, प्रेम, श्रद्धा आणि समर्पण यापैकी काय आहे तुझ्यात…?
मंदिरातून दर्शन घेऊन आल्यावर समोर रामभाऊ दिसला… गेला रामभाऊच्या पुढं लाचारासारखा, आणि लागला शहाजुकीच्या गप्पा मारायला…
‘रामभाऊ… फक्त माणसानं नीती चांगली ठेवावी हो… काही संग न्यायचं नाहीये… सगळं इथंच राहणार आहे… पाहू तंबाखू काढा…!’
घेतली रामभाऊची पुडी… लागला नीतिच्या गप्पा मारायला… काहीच बरोबर न्यायचं नाहीये… बरोबर बोलला का तू फुकण्या…? तुला फक्त रामभाऊचा विडा तोंडात घालून घरापर्यंत थुकत जायचं आहे… अहो भजनाला माणसं तंबाखू चोळल्याशिवाय उभे राहत नाहीत… ज्या परमेश्वराचं नाम घ्यायचं ते थोबाड तरी चांगला असावं ना…? थोबाडं सडलेत काहींचे, पण ते सुधारले नाहीत… साऱ्या गावाची फुकट तंबाखू खाऊन तो नीतिमत्तेच्या गप्पा मारायला लागला…
‘नीतिमत्ता चांगली ठेवावी, काही बरोबर न्यायचं नाही…’
परमार्थित क्षेत्रात फार नमुने भेटतात, परंतु नुसतंच मंदिरात जाणं, किंवा देवपूजा करणं ही आपली धार्मिकता नसतेच… माणसानं कुठं बसावं, कसं बसावं, कुठं उभं राहावं, रस्त्यानं कसं चालावं, काय खावं, कुठं खावं, आणि कुठं थुकावं, याचंही भान राहिलं नाही… किती सरकारी कार्यालयं आणि दवाखान्याच्या भिंती घाण कराव्यात या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत… घरात देवपूजा करणारे सुद्धा ध्यानावर नाहीत… अंघोळ झाली की बसला अंडरपॅन्ट वरच देवघरात… तू देवपूजा करायला बसलाय की भिक मागायला बसलाय…? आणि तुझ्यासारख्या भिकारड्याला तर देवानं कितीही दिलं तरी तुझं पोट भरणार आहे का…? फार फार तर तुझं पोट सुटू शकतं… देवपूजा झाल्यावर आरती करताना एकीकडं घंटी हालवतो, तर दुसरीकडं ढेरी हालवतोय… शेजारी कोणाच्या वाढदिवसाला, सत्यनारायणाला जायचं असल तर इन-बिन करून, मेकअप करून, स्प्रे मारून जातोय… आणि देवघरात अंडरपॅन्ट वरच बसतोय… खरंतर देवानं नाही पण तुझ्या पोरांनी तुला पोत्यात घालून हाणला पाहिजे… अन अशा जर नासक्या मेंदूच्या लोकांना वाटत असेल की परमेश्वराची आमच्यावर कृपा व्हावी, तर तशी कृपा कधीच होणार नाही… आणि तू कृपेची वाट पण पाहू नको… अगोदर तु स्वतःच तुझी तुझ्यावरच कृपा करायला शिक… उगाच बोंबलत फिरून आणि कान धरून देवापुढं उठाबशा मारून तू काही अपेक्षाच करू नको… देवाला तुझ्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे ते बघ… सकाळी टिळे लावून फिरायचं, अन रात्री तुला उचलून आणायचं… तुला उचलणारे सुद्धा वेळेवर येतात हीच तुझ्यावर परमेश्वराची सर्वात मोठी कृपा आहे… बाकीचा विचार तु करूच नको…
शब्दांकन :-भाऊ थोरात
…



