वैजापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लेने को हरिनाम देने को अन्नदान या उक्तीप्रमाणे सदगुरू गंगागिरी महाराज यांनी ज्या परंपरेला प्रारंभ केला, ती परंपरा आजतागायत चालू आहे. कितीही अडचणी आल्या तरी सप्ताह चालू राहील. सदगुरू गंगगिरी महाराजांनी सप्ताह सुरू केला तेव्हा देश स्वतंत्र नव्हता. देश पारतंत्र्यात असतानाही सप्ताह चालू होता. प्रभावीपणे परमार्थ त्यांनी चालविला होता. आता आपण स्वतंत्र भारतात आहोत. आपल्यावर सदगुरू गंगागिरी महाराजांचे संस्कार आहेत. भक्ती अशी गोष्ट तीचा विट येत नाही. संसारात काही काही काळ सुख आहे परंतु नंतर विट येतोच. परमार्थात विट येत नाही. संसारात बाप लहान वयात चांगला सांभाळतो, कारण म्हतारपणी मुलगा आपल्याला सांभाळील. संसारात स्वार्थी लोक तर परमार्थात निःस्वार्थी लोक आहेत. खरे प्रेम, सुख परमार्थात आहे. स्वत: आनंद घ्या, दुसर्यालाही द्या, हे परमार्थात आहे. गोदावरी धामचे व गंगागिरीजी महाराज यांच्या सप्ताहात ज्ञानदान व अन्नदान अंखड सुरू राहील असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.
गिनीज बुक ऑफ इंडियात नोंद असलेला वारकऱ्यांचा महा कुंभ समजला जाणारा योगीराज गंगागिरी महाराज यांचा 176 वा अखंड हरिनाम सप्ताह वैजापूर नगरीत गेल्या सात दिवसात संपन्न झाला,आपल्या अडीच तासांच्या सांगतेच्या काल्याच्या किर्तनात श्रीकृष्णाच्या चरित्रावर महंत रामगिरी महाराज यांंनी कीर्तन केले. येथे कुळ माझे गेले हरपुनी। श्रीरंगा वाचोनी आणू नेणे॥ या संत ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या गौळण निरुपणास घेत त्यावर कीर्तन केले.श्रीकृष्ण परमात्म्याशी ऐक्य पावल्यामुळे माझी जात, कुळ सर्व हरपून गेले. आतां श्रीकृष्ण परमात्म्यावाचून दुसरे काही जाणत नाही. तुम्ही मला पुष्कळ व वारंवार कितीही शिकवले, उपदेश करता परंतु त्याचा काय उपयोग? मी त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी रममाण होऊन गेले आहे. स्त्रीपुरूष भोगांमध्ये दर्शन स्पर्शनादि अष्टभोग आहेत.त्याची आतां मला चाड नाही.कारण श्रीकृष्ण परमात्म्याच्या अत्यंत प्रेमभक्तीचे गोड़ लेणे मी आपल्या अंगावर धारण केले आहे. त्यामुळे अष्टभोगाची मला काय चाड आहे. माझ्या जीवाचा जिव्हाळा असलेले माझे पिता व रखुमाईचा पति जे श्रीविठ्ठल असे जे माझे बाप ते काही केल्या आतां जीवापासून वेगळा होत नाहीत.वारकरी सांप्रदायात काल्याला विशेष महत्त्व आहे. काला हा एकमेकांना वाटून खायचा असतो, जीव ब्रम्ह ऐक्य रुपी काला आहे. भगवान गोकुळात तर संत आपल्यासाठी काला करतात ज्याना दुसर्याचे सुख बघवत नाही, दुसर्याच्या सुखाचा नाश करू नये, दुसर्याला आनंद देणारांना भगवंताकडे जावे लागत नाही तर भगवंत त्याच्याकडे येतात. भगवंत गोकुळात प्रकट झाले. यश प्रदान करणारी वृत्ती म्हणजे यशोदा! नंद म्हणजे आनंद! जो जगाला देतो. भगवंत गोकुळात प्रकट होतात जसे आपण भगवंतावर प्रेम करतो, तसे भगवंत आपल्यावर करतात. गोकुळातील गोपिकांचे प्रेमाचे वर्णन करत महाराज म्हणाले, कृष्णाने चोर्या केल्या नाही तर चौर्य लिला केल्या. चोरी करणे अपराध आहे. चोरी करणारा दंडास पात्र असतो. भगवंताने चौर्य लिला केल्या. लिला या आनंदाकरिता असतात. प्रेमाच्या चोरीत, भांडणातही आनंद असतो. लोणी हे माध्यम आहे. लोण्याप्रमाणे भगवंत भक्ताच्या चित्ताची चोरी करतो
यावेळी उपस्थित दहा ते बारा लाख भाविकांना 500 पोते बुंदी व 700 पोते चिवडा सात ते आठ मिनिटांमध्ये वाढ पूर्ण करण्यात आली.या प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे , ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रशांत बंब ,माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे , सप्ताह समितीचे अध्यक्ष आमदार रमेश बोरणारे , डॉ दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, शिल्पाताई परदेशी, विशाल संचेती,पंकज ठोंबरे,सरला बेटांचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
पुढील वर्षीचा 177 वा अखंड हरिनाम सप्ताह मागणी वाढली
वैजापूर येथे सुरू असलेला 176 वा अखंड हरिनाम सप्ताह मध्ये पुढील वर्षीचा 177 वा सप्ताह मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यासाठी, रत्नापूर गंगापूर तालुक्याच्या वतीने आमदार प्रशांत बंब, सभापती संतोष जाधव यांनी मागणी केली, आडगाव ग्रामस्थ तालुका राहाता , सावखेड गंगा पंचक्रोशी तालुका वैजापूर, वडाळा महादेव पंचक्रोशी तालुका श्रीरामपूर, डोंगरगाव पंचक्रोशी समस्त ग्रामस्थ तालुका येवला, नेवासा पंचक्रोशी तालुका नेवासा, अनकवाडे पंचक्रोशी तालुका नांदगाव, कुंभारी ग्रामस्थ तालुका कोपरगाव, चांदवड ग्रामस्थ तालुका चांदवड, नारखेडा गारखेडा पंचक्रोशी तालुका येवला, आधी सह विविध गावाहून अनेकांनी सप्ताह मागणी केली.



