श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):– तांत्रिक शिक्षणासाठी ओ.बी.सी., अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती विद्यार्थी तसेच विद्यार्थीनींसाठी शासनाच्या शिष्यवृत्ती आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्याने घेतला पाहिजे आणि कालसुसंगत असे तांत्रिक शिक्षण घेतले पाहिजे. अशोक फार्मसी महाविद्यालयामुळे आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना माफक शुल्कात दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले आहे. औषध निर्माण शास्त्र क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तांत्रक शिक्षणास प्राधान्य द्यावे, असे आवाहन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
अशोक कारखाना संलग्न अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ‘अशोक कॉलेज ऑफ फार्मसी’ चा उद्घाटन सोहळा माजी आमदार श्री.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली तसेच श्री.अमोल न्यायनित, सहाय्यक संचालक (तांत्रिक) यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, संस्थेच्या कार्यकारी अध्यक्षा सौ.मंजुश्री मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, सुरेश गलांडे, हिम्मतराव धुमाळ, नाना पाटील, ज्ञानेश्वर काळे, विरेश गलांडे, सौ.शितलताई गवारे, हरीदास वेताळ, अॅड.सुभाष चौधरी, मयुर पटारे, भाऊसाहेब दोंड, संतोष देवकर, संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, अशोक महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य सौ.सुनिता गायकवाड, अशोक पॉलिटेक्निकचे प्राचार्य अंजाबापु शिंदे, अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख, अशोक इंग्लिश मिडीयमचे प्राचार्य संपत देसाई आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तांत्रिक शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक श्री.अमोल न्यायनित म्हणाले की, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेने सुरु केलेले फार्मसी महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती शासनाकडून दिल्या जातात. त्याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती करुन घेतली पाहिजे. तांत्रिक कोर्सेससाठी ओ.बी.सी. प्रवर्गाला ५० टक्के तर अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व भटक्या विमुक्त जमातींसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना माफक दरात शिक्षण घेता येते. अशी माहिती श्री.न्यायनित यांनी दिली.
प्रास्ताविकात संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालिचा आढावा घेतला. तसेच अशोक कॉलेज ऑफ फार्मसीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची औषध निर्माण शास्त्रात शिक्षणाची गरज पूर्ण झाली आहे. यावर्षी डि.फार्मसी सुरु करण्यात येणार असून पुढील टप्प्यात बी.फार्मसीही चालु करण्यात येणार आहे. अशोक कॉलेज ऑफ फार्मसीमुळे अशोक शिक्षण संस्थेच्या वैभवात भर पडली आहे. अशोक शैक्षणिक संकुलात आपल्या परिसरातील तसेच नेवासा, राहुरी आदी भागातील ३ हजार ७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशोक शिक्षण संस्थेचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली वटवृक्षात रुपांतर झाल्याचे त्या म्हणाल्या. प्राचार्य अंजाबापु शिंदे यांनी फार्मसी महाविद्यालयाबाबत सविस्तर माहिती दिली. सहसचिव भास्कर खंडागळे यांनी स्वागत केले. तर प्रा.अरुण कडू यांनी अतिथी परिचय करुन दिला. प्राध्यापक महेश नवपुते यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सुचनेस प्रा.मोहित गायकवाड यांनी अनुमोदन दिले. तर प्रा.रामेश्वर पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दत्तात्रय झुराळे यांनी केले. यावेळी कारखान्याचे सभासद, विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



