श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):– या वर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांची पिके जळून गेली आहेत. त्यामुळे शासनाने दुष्काळ जाहीर करावा तसेच बँकांनी शेतकर्यांच्या कर्जात सवलत द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी केली आहे.
सलग दोन वर्षे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानीने शेतकर्यांचे अक्षरशा कंबरडे मोडले. या नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. परंतु त्याची रक्कम अद्यापही संबंधित शेतकर्यांच्या खात्यात वर्ग झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक आरीष्टात सापडला आहे. अशा स्थितीत काही बँकांनी शेतकर्यांना कर्ज वसुलीच्या नोटीसा पाठवून पठाणी पद्धतीने वसुली सुरु केली आहे. आधीच शेतकरी अडचणीत असताना या नोटिसांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी जून, जुलै, ऑगस्ट तीन महिने तालुक्यात पाऊस नाही. त्यामुळे सर्वत्र दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गावोगाव पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाणी व चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाईमुळे अनेक गावात महिला डोक्यावरुन पाणी आणताना दिसत आहे. तालुक्यातील ही परिस्थिती इतर तालुक्यातही दिसत आहे.
अशी परिस्थिती असताना शासनाने अद्याप दुष्काळ जाहीर केला नाही तसेच त्याबाबत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत, तरी ही परीस्थिती लक्षात घेता शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकर्यांकडील थकीत कर्जात सवलत द्यावी, बँकांकडून होणारी वसुली थांबविण्यात यावी तसेच विमा कंपन्यांनी २५ टक्के अग्रिम रक्कम तातडीने शेतकर्यांना अदा क्ररुन अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अशोक कानडे यांनी केली आहे.



