spot_img
spot_img

डॉ.करणसिंह घुले यांच्यावर लादलेले खोटे गुन्हे मागे घ्या. नेवासा येथे बंद पाळून प्रशासनाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा  ):-नेवासाफाटा येथे रस्त्याच्या कारणावरून प्रतिष्ठित समाजसेवक डॉ.करणसिंह घुले यांच्या मालकी हक्काच्या जागेतच राडा होऊन डॉ.घुलेंसह त्यांच्या बंधूंवर दाखल झालेल्या खोटया गुन्हयाच्या निषेधार्थ मंगळवारी दि.५ सप्टेंबर रोजी नेवासा येथे बंद पाळून प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.खोटे गुन्हे लादणाऱ्या तहसीलदाराचा धिक्कार असो,तहसीलदार मुर्दाबाद असा घोषणा देत सदरचा मोर्चा तहसील कचेरीवर नेण्यात आला.

नेवासा येथील प्रतिष्ठित समाजसेवक व सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले व त्यांच्या बंधूंवर नेवासा प्रशासनाने खोटे गुन्हे नोंदविल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दि.५ सप्टेंबर रोजी नेवासा शहरात मोर्चा काढण्यात आला.या निमित्ताने व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेऊन निषेध व्यक्त केला. श्रीरामपूर रोडवरील श्री खोलेश्वर मंदिर चौकापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.या मोर्चाला व डॉ.करणसिंह घुले यांच्या चांगल्या कामाकडे पहाता नेवासा तालुका मेडिकल असोसिएशन,समर्पण मजदूर संघ,नेवासा व्यापारी संघटना,मेडिकल केमिस्ट अँण्ड ड्रॅगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.सदरचा मोर्चा खोलेश्वर मंदिर, नगरपंचायत चौक,मुख्य पेठ,डॉ.हेडगेवार चौक,छत्रपती संभाजी चौक,औदुंबर चौक मार्गे श्रीरामपूर रोडवरून नेवासा तहसील कार्यालयावर गेला.

मोर्चा प्रसंगी ॲड.मयूर वाखुरे यांनी प्रास्ताविक केले.सर्वजण पक्ष न पाहता चांगल्या कार्याला साथ म्हणून एकत्रित आल्याबद्दल उपस्थित हजारो मोर्चेकरांचे समर्पण मजदूर संघाचे कृष्णा डहाळे यांनी स्वागत केले. डॉ. करणसिंह घुले यांनी नेवासा शहराच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात मोलाचे योगदान दिले आहे,नेत्रदान व अवयव दान चळवळ सुरू करून त्यांनी समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. असंघटित असलेल्या हजारो बांधकाम कामगारांना एकत्रित करून त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना न्याय देण्याचे कार्य केले आहे म्हणून नेवासा तालुक्यात सुमारे सोळा हजार कामगार वर्ग डॉ.घुले यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. घुले यांनी दिलेल्या योगदानामुळे सर्व पक्षीय व सर्वधर्मीय नागरिक, व्यापारी,उद्योजक,वकील इंजिनियर,शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी समाज आज एकत्रित आले असल्याचे सांगत तहसीलदार संजय बिरादार यांनी डॉ.घुलेंवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नंदकुमार पाटील, भाऊसाहेब वाघ, ॲड.संजय सुखदान,मेडिकल असोसिएशनचे डॉ.लक्ष्मणराव खंडाळे,शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, भाजपचे युवा नेते अनिल ताके,माजी सरपंच रामभाऊ पोतदार सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोतदार,भारतीय जनसंसदचे कारभारी गरड, नेवासा बुद्रुकचे माजी सरपंच प्रकाश सोनटक्के, ॲड.जानकीराम डौले,भाजपचे ओबीसी विभागाचे राज्य संपर्क प्रमुख निरंजन डहाळे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी आपल्या मनोगताद्वारे तहसीलदार यांचा निषेध केला.

कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे आणि वरील घटना प्रकरणी जमावाला चिथावणी देण्याचे काम त्यांनी केले,त्यासाठी लॅन्ड माफियांशी हातमिळवणी केली,घुले यांची खाजगी मालमत्ता असतांना देखील तहसीलदार यांनी रस्ता खुला करून एक प्रकारची गुंडगिरीच केली असा आरोप यावेळी भाषणाच्या वेळी वक्त्यांनी केला तसेच डॉ.करणसिंह घुलेंसह त्यांच्या बंधूंवर लादण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत तोपर्यंत हा वाद मिटणार नाही असे यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

तहसीलदार यांनी डॉ.करणसिंह घुलेंसह इतरांवर खोटे गुन्हे दाखल केले असल्याने याचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा अन्यथा आम्ही संभाजीनगरच्या उच्चन्यायालयात दाद मागू असा निर्धार ही यावेळी मोर्चेकऱ्यांनी बोलताना व्यक्त केला.यावेळी निवेदन घेण्यासाठी तहसीलदार,नायब तहसीलदार एक ही अधिकारी पुढे आला नाही.त्यामुळे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी निवेदन स्वीकारले .व वरिष्ठांकडे आपल्या भावना कळवू असे आश्वासन दिले.

यावेळी झालेल्या मोर्चा प्रसंगी कष्टकरी,कामगार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी,वकील,इंजिनियर पत्रकार,बांधकाम कामगार,उद्योजक,विविध तरुण मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह हजारो युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दीड तास चाललेला मोर्चा शांततेत पार पडला.मोर्चा झाल्यानंतर स्वयंस्फूर्तीने बंद पाळणाऱ्या व्यापारी वर्गाला आपली दुकाने खुले करून व्यवहार पूर्ववत सुरळीत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!