नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- विद्यार्थ्यांना घडविण्यात, त्यांना सक्षम करण्यात, जीवनाला योग्य दिशा देण्यात आणि शैक्षणिक जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा असणारे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे स्थान म्हणजे शिक्षक. जसा संपूर्ण भारतभर शिक्षक दिन आज उत्साहात साजरा झाला अगदी तसंच श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देखील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आजच्या या कार्यक्रमानिमित्त ‘विश्व गुरू भारत’ या विषयावर व्याख्यान महाविद्यालयामध्ये आयोजित केलं होतं.
भारतीय ज्ञानाची परंपरा आणि विज्ञानाच्या जोरावर भारत देश पुढील काही वर्षांमध्ये जगापुढे आदर्श निर्माण करेल, तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठाच ज्ञानार्जन करणारा भारत देश विश्व गुरु बनेल, असा विश्वास कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री. रविंद्र मुळे यांनी व्यक्त केला. शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.
विद्यार्थ्यांनी देखील आपली मते यावेळी व्यक्त केली. प्राचीन काळापासून शिक्षकांचा मान सन्मान कसा जोपासला आणि जपला गेला ह्या गोष्टी देखील विद्यार्थ्यांनी अगदी समर्पक शब्दांत व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांमधून चैतन्य रोहाकले, स्मितकुमार मार्डे, यशश्री उंडे, झैनाब शेख या सर्वांनी तर शिक्षकांमधून प्रा. रुपेश दगदीया यांनी शिक्षक दिनाविषयी भाषणे केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गिरीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी प्रतिनिधी यश निंबाळकर, ओमकार साबळे, तेजस मुंगसे, अजित गर्जे, श्रीराम जगदाळे, वैष्णवी सावंत आणि ‘छत्रपती विचारधारा’ ग्रुप यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थी ओनकार कांडेकर याने केले तर आभार प्रदर्शन ओमकार वाळके या विद्यार्थ्याने केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या या शिक्षकांच्या सत्कारांबद्दल शिक्षकांमधून प्रा. अक्षय देखणे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमास सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे सर यांच्याबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



